संविधानाच्या मूल्यांवरच भारताची लोकशाही उभी – सभापती राम शिंदे
* विधान भवन येथे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती * भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे समान अधिकार आणि मानवी मूल्यांची जाणीव – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई, २६ जानेवारी (हिं.स.) : विधान भवन, मुं
विधान भवन


* विधान भवन येथे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती

* भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे समान अधिकार आणि मानवी मूल्यांची जाणीव – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, २६ जानेवारी (हिं.स.) : विधान भवन, मुंबई येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७व्या वर्धापनदिनानिमित्त विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (२) (कार्यभार) मेघना तळेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे म्हणाले की, भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचे मजबूत अधिष्ठान आहे. संविधानाने दिलेले स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांमुळेच भारत एकसंध आणि सक्षम राष्ट्र म्हणून पुढे जात आहे. नागरिकांनी केवळ हक्कांपुरते मर्यादित न राहता आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवून संविधानाचा सन्मान केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. देशाच्या प्रगतीसाठी संविधानिक मूल्यांचे पालन आणि लोकशाही परंपरांचे जतन करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही राम शिंदे यांनी नमूद केले.

कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे आपल्या संविधानाने दिलेल्या समान अधिकारांची आणि मानवी मूल्यांची आठवण करून देणारा दिवस आहे. संविधान अस्तित्वात आल्यानंतर भारत एक सार्वभौम राष्ट्र म्हणून उभा राहिला आणि जात, धर्म, वंश, लिंग, श्रीमंत-गरीब असा कोणताही भेद न करता प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देण्यात आले. ही राज्यघटना अत्यंत क्रांतिकारी असून तिने लोकशाही मूल्यांना बळ दिले आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच, आजही समाजात सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांबाबत गैरसमज, हिंसाचार, दबावतंत्र आणि विशेषतः महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिसून येतात. त्यामुळे प्रजासत्ताक म्हणून आपण अजूनही सुशासनाच्या दिशेने अधिक भक्कम वाटचाल करण्याची गरज आहे, असे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र विधानमंडळात सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande