
अमरावती, 26 जानेवारी (हिं.स.)।
मराठी भाषेचे खरे सामर्थ्य तिच्या प्रमाणभाषेत नव्हे, तर तिच्या विविध बोलींमध्ये दडलेले आहे. बोली टिकल्या तरच भाषा जिवंत राहते आणि पुढील पिढीपर्यंत तिचा वारसा पोहोचतो, असे ठामपणे नमूद केले. बोलीभाषांमधून लोकजीवन, संस्कृती, मूल्ये आणि इतिहास यांचे प्रतिबिंब उमटते. त्यामुळे बोलीभाषांचे शास्त्रीय अध्ययन, दस्तऐवजीकरण आणि विद्यापीठीय पातळीवर संशोधन होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी केले.
मराठी भाषेच्या विविध बोलींचे जतन, संवर्धन व संरक्षण या उद्देशाने भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुरस्कृत आणि मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या निमित्ताने ‘बोलींचा जागर’ हा विशेष कार्यक्रम मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर (अमरावती) येथे मोठ्या उत्साहात व अभ्यासपूर्ण वातावरणात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. मराठी ज्ञानपरंपरेचे प्रतीक असलेल्या ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची भारदस्त व संस्कारक्षम सुरुवात झाली. परंपरा, संस्कृती आणि बोलीवैभव यांचा सुरेख संगम साधणारी ही ग्रंथदिंडी उपस्थितांच्या मनावर विशेष ठसा उमटवून गेली. मराठी भाषेच्या समृद्ध बोलीपरंपरेचे दर्शन घडवणार्या या कार्यक्रमात कोकणी, वर्हाडी, ठाकर, कोरकू आदी बोलींच्या लोककलांचे सादरीकरण, बोलीभाषांवरील संवाद सत्रे तसेच अभ्यासकांचे सखोल मार्गदर्शन यामुळे उपस्थितांना महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा जिवंत अनुभव घेता आला.
प्रमुख अतिथी डॉ. काशिनाथ बहाडे यांनी कोरकू बोलीच्या उदाहरणातून बोलीभाषा व समाजजीवन यांचे अतूट नाते स्पष्ट केले. बोलीभाषा ही केवळ संवादाचे साधन नसून त्या-त्या समाजाची ओळख, जीवनदृष्टी आणि अनुभवविश्व व्यक्त करणारी समृद्ध सांस्कृतिक ठेव आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. मंदा नांदूरकर यांनी आपल्या भाषणात कोरकू संस्कृतीचे वैशिष्ट्य सविस्तरपणे उलगडून सांगितले. कोरकू समाजाची बोली, लोकगीतं, सण-उत्सव, नृत्यपरंपरा, श्रद्धा आणि निसर्गाशी असलेले नाते यांमधून एक स्वतंत्र व समृद्ध सांस्कृतिक विश्व व्यक्त होते. कोरकू संस्कृती ही केवळ भूतकाळाचा वारसा नसून आजही जिवंत असून तिच्यातून आदिवासी समाजाची जीवनदृष्टी, सामूहिकता आणि मूल्यव्यवस्था स्पष्टपणे दिसून येते. या संस्कृतीचे संवर्धन करताना भाषेसह परंपरा, लोकज्ञान आणि जीवनशैलीचेही जतन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमातील लोककला सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. ‘जागर मराठी भाषेचा’ या प्रभावी नाट्यसादरीकरणातून मराठी भाषेचा इतिहास, बोलीभाषांचे वैभव, लोकजीवनातील भाषेचे स्थान आणि तिचे सांस्कृतिक सामर्थ्य अत्यंत भावस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आले. संवाद, गीत, अभिनय आणि लोकधाटीच्या सादरीकरणामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले व या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी