

रायगड, 26 जानेवारी (हिं.स.)।
नेरळ–माणगाव रोडवरील राबीया बकरी फॉर्म येथे सोमवारी रात्री सुमारे १.३० ते २.०० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली. या आगीत राबीया फॉर्ममधील सुमारे ३०० ते ४०० बकऱ्या होरपळून मृत्युमुखी पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली नसल्याचे समोर आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास फॉर्म परिसरातून अचानक धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. काही क्षणातच आग भडकत गेली आणि बकरी पालनासाठी उभारलेल्या शेड्सना आगीने वेढले. आगीची तीव्रता इतकी होती की बकऱ्यांना बाहेर काढण्यास वेळच मिळाला नाही. परिणामी मोठ्या संख्येने मुक्या प्राण्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
फॉर्म मालकाच्या म्हणण्यानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विद्युत वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने ठिणग्या पडल्या आणि त्यातूनच आग लागली असावी, असे त्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीस धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आगीवर नियंत्रण मिळवले; मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
या आगीत फॉर्मचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून बकरी पालनावर अवलंबून असलेल्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. घटनेनंतर महसूल व पशुसंवर्धन विभागाकडून पंचनामा करण्यात येण्याची प्रक्रिया सुरू असून नुकसानभरपाईबाबत मागणी करण्यात येत आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी विद्युत सुरक्षेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके