
अमरावती, 26 जानेवारी (हिं.स.)
शासनाने अवैध रेती उत्खननावर बंदी घातलेली असतानाही वर्धा नदीच्या बॅक वॉटरमध्ये रेती माफियांनी अक्षरशः नदीच्या छाताडावर घाला घातल्याचा धक्कादायक प्रकार जुना धारवाडा येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणात महसूल व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत १७ ब्रास अवैध रेती जप्त करण्यात आली असून, धारवाडा येथील दोन व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष किसनराव रताळे व विजय योगेश्वर इंदोरे (रा. धारवाडा, ता. तिवसा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी संतोष दामोदर मानमोडे (वय ४७, रा. अमरावती) यांनी पोलिस स्टेशन कुर्हा येथे २४ जानेवारी रोजी लेखी तक्रार दिली आहे.
माहितीनुसार, महसूल अधिकारी मानमोडे हे आपल्या सहकार्यांसह मूर्तिजापूर तरोडा येथून जुना धारवाडा परिसरातील वर्धा नदीच्या बॅकवॉटर काठावर पाहणीसाठी गेले असता, नदीच्या मध्यभागी दोन बोटी, इंजिन व रेती उपसण्याचे साहित्य स्पष्टपणे दिसून आले. तपासणी दरम्यान इंजिनच्या साह्याने रेती उपसा सुरू असतानाच दोघे आरोपी रंगेहात आढळून आले. अधिकार्यांनी आवाज दिल्याचा क्षणातच संशयितांनी बोटी व इंजिन घेऊन वर्धा जिल्ह्याच्या हद्दीत पलायन केले, मात्र उत्खनन करून बॅकवॉटर काठावर साठवून ठेवलेली १७ ब्रास रेती प्रशासनाच्या हाती लागली. सदर रेतीची किंमत अंदाजे १ लाख २ हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे.
कारवाईनंतर सदर जप्त रेती पोलिस पाटील दुर्गवाडा यांच्या ताब्यात देण्यात आली. आरोपींविरुद्ध अवैध रेती उत्खनन, शासनाची मालमत्ता चोरणे, पर्यावरणाचा र्हास करणे व बेकायदेशीर साठवणूक या गंभीर स्वरूपाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कुर्हा पोलिसांकडून सुरू आहे.वर्धा नदी परिसरात वाढत चाललेल्या अवैध रेती उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल धोक्यात आला असून, नदीपात्र खोल होत असल्याने पूरस्थितीचा धोका देखील वाढत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी