अमेरिकेत डेमोक्रॅटिक खासदार इल्हान ओमर यांच्यावर हल्ला, हल्लेखोराला अटक
वॉशिंग्टन , 28 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेत विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदार इल्हान ओमर यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने अचानक हल्ला केला. मिनियापोलिस येथील एका टाउन हॉलमध्ये इल्हान ओमर नागरिकांना संबोधित करत असताना हा प्रकार घडला. भाषण सुरू असताना
अमेरिकेत डेमोक्रॅटिक खासदार इल्हान ओमर यांच्यावर हल्ला, हल्लेखोराला अटक


वॉशिंग्टन , 28 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेत विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदार इल्हान ओमर यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने अचानक हल्ला केला.

मिनियापोलिस येथील एका टाउन हॉलमध्ये इल्हान ओमर नागरिकांना संबोधित करत असताना हा प्रकार घडला. भाषण सुरू असतानाच एक व्यक्ती त्यांच्या जवळ आली आणि ओमर यांच्यावर अज्ञात पदार्थ फेकला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ हल्लेखोराला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला ट्रम्प प्रशासनाच्या इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (आयसीई) एजंटने मिनियापोलिसमध्ये एका महिलेची गोळी झाडून हत्या केली होती. या घटनेच्या निषेधार्थ इल्हान ओमर भाषण करत होत्या. हल्ल्याच्या काही क्षण आधी त्या आयसीई संस्था बरखास्त करण्याची आणि गृहमंत्री क्रिस्टी नोएम यांच्या राजीनाम्याची मागणी करत होत्या.इल्हान ओमर भाषण करत असताना काळी जॅकेट घातलेला एक व्यक्ती त्यांच्या जवळ आला. त्याच्या हातात एक सिरिंज होती. त्याने सिरिंज ओमर यांच्याकडे रोखून दाबली. प्रत्यक्षदर्शींनुसार, सिरिंजमध्ये कोणते तरी द्रव पदार्थ होते, ज्यातून सिरक्यासारखा वास येत होता. मात्र, या हल्ल्यात ओमर यांना कोणतीही शारीरिक इजा झाली नाही. हल्ल्यानंतर त्या क्षणभर घाबरल्या असल्या तरी त्यांनी स्वतःला सावरत सांगितले की, आपण अशा हल्ल्यांना घाबरणार नाही.

मिनियापोलिस पोलिसांनी हल्लेखोराला अटक करून काउंटी तुरुंगात दाखल केले आहे. त्याच्याविरोधात थर्ड डिग्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेच्या तपासासाठी फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले असून, अज्ञात पदार्थाचे नमुने तपासासाठी जप्त करण्यात आले आहेत.

घटनेनंतर इल्हान ओमर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करत म्हटले, “मी पूर्णपणे सुरक्षित आहे. असे किरकोळ हल्लेखोर मला माझे काम करण्यापासून थांबवू शकत नाहीत. मी त्यांच्या धमक्यांना घाबरणार नाही. माझ्या पाठीशी उभे राहणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार.”

या हल्ल्यानंतर अद्याप व्हाइट हाऊसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. इल्हान ओमर यांना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कट्टर टीकाकारांपैकी एक मानले जाते. ट्रम्प यांनीही अनेक वेळा ओमर यांच्यावर टीका केली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये एका कॅबिनेट बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी ओमर यांना “कचरा” असे संबोधले होते आणि त्यांच्या समर्थकांनाही त्याच शब्दांत हिणवले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande