भारत-पाक संघर्षात ट्रम्प यांचा थेट हस्तक्षेप नव्हता -अमेरिकी सिनेटर मार्क वॉर्नर
वॉशिंग्टन, 29 जानेवारी (हिं.स.)।भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अलीकडील संघर्ष संपवण्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एकहाती निर्णायक भूमिका बजावली, हा दावा अतिशयोक्तीपूर्ण आहे, असे विधान प्रभावशाली अमेरिकन सिनेटर मार्क वॉर्नर यांनी केला आहे. अ
भारत-पाक संघर्षात ट्रम्प यांचा थेट हस्तक्षेप नव्हता -अमेरिकी सिनेटर मार्क वॉर्नर


वॉशिंग्टन, 29 जानेवारी (हिं.स.)।भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अलीकडील संघर्ष संपवण्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एकहाती निर्णायक भूमिका बजावली, हा दावा अतिशयोक्तीपूर्ण आहे, असे विधान प्रभावशाली अमेरिकन सिनेटर मार्क वॉर्नर यांनी केला आहे. अशा दाव्यांमुळे संघर्षाच्या निराकरणाची खरी परिस्थिती धूसर होण्याचा धोका असून, संवेदनशील प्रादेशिक कूटनीतीच्या टप्प्यावर तणाव वाढू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

एका विशेष मुलाखतीत शक्तिशाली सिनेट इंटेलिजन्स समितीचे अध्यक्ष आणि सिनेट इंडिया कॉकसचे सह-अध्यक्ष असलेल्या मार्क वॉर्नर म्हणाले, “भारत सरकारचे सदस्य, गुप्तचर यंत्रणा आणि अमेरिकन गुप्तचर समितीकडून मला जे ऐकायला आणि वाचायला मिळाले आहे, त्यावरून हे स्पष्ट होते की हा तोडगा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परस्पर संवादातूनच निघाला.” ते पुढे म्हणाले की, अशा परिस्थितींसाठी नवी दिल्ली आणि इस्लामाबाद यांच्यात आधीपासूनच संवादाचे निश्चित माध्यम अस्तित्वात आहेत आणि अशा प्रसंगी दोन्ही देशांमध्ये थेट चर्चा होत असते.

वॉर्नर यांनी मान्य केले की अमेरिकेने सहाय्यक भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला असावा, मात्र अध्यक्ष ट्रम्प यांनी वैयक्तिकरित्या थेट हस्तक्षेप केला, हा दावा त्यांनी स्पष्टपणे फेटाळला. त्यांनी स्पष्ट केले की उपलब्ध माहितीवरून वॉशिंग्टनने एकट्यानेच हा तणाव संपवला, या दाव्याला कोणताही ठोस आधार मिळत नाही. ते म्हणाले, “अमेरिकेने मदत करण्याचा प्रयत्न केला असू शकतो, पण ट्रम्प यांनी स्वतः वैयक्तिक पातळीवर हस्तक्षेप केला, असे मला वाटत नाही.” या प्रकारचे चित्रण अहंकारातून प्रेरित असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हा संघर्ष दोन्ही अण्वस्त्रसज्ज शेजारी देशांना विनाशाच्या उंबरठ्यावर घेऊन गेला होता का, या प्रश्नावर वॉर्नर म्हणाले की परिस्थिती गंभीर होती, मात्र अभूतपूर्व नव्हती. भारत आणि पाकिस्तान यांना यापूर्वीही अशा अनेक संकटांचा सामना करावा लागलेला आहे. पाकिस्तानबाबत बोलताना वॉर्नर म्हणाले की, तो भारतावर अत्यधिक लक्ष केंद्रित करतो. “अनेकदा असे वाटते की पाकिस्तान भारताबाबत अतिशय आसक्त आहे. याउलट भारत त्या स्पर्धेपलीकडे गेला आहे. भारत जेव्हापासून जागतिक शक्ती म्हणून उदयास आला आहे, तेव्हापासून तो त्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याच्या चौकटीत अडकलेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

--------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande