कोलंबियामध्ये विमान अपघात; १५ जणांचा मृत्यू
बोगोटा, 29 जानेवारी (हिं.स.)।कोलंबियाच्या ईशान्य भागात असलेल्या नोर्ते दे सांतांदेर प्रांतातील एका ग्रामीण परिसरात बुधवारी एक विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या भीषण अपघातात विमानातील सर्व 15 जणांचा मृत्यू झाला असल्याची पुष्टी स्थानिक अधिकाऱ्यांनी केली
कोलंबियामध्ये विमान अपघात; १५ जणांचा मृत्यू


बोगोटा, 29 जानेवारी (हिं.स.)।कोलंबियाच्या ईशान्य भागात असलेल्या नोर्ते दे सांतांदेर प्रांतातील एका ग्रामीण परिसरात बुधवारी एक विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या भीषण अपघातात विमानातील सर्व 15 जणांचा मृत्यू झाला असल्याची पुष्टी स्थानिक अधिकाऱ्यांनी केली आहे. हे विमान सरकारी विमानसेवा कंपनी साटेनाचे होते.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने सकाळी 11:42 वाजता कुकूता शहराच्या विमानतळावरून उड्डाण केले होते. ते ओकान्या शहराकडे जात होते, जे डोंगराळ भागात स्थित आहे.साधारणपणे हा प्रवास सुमारे 40 मिनिटांचा असतो. मात्र उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. या विमानात एकूण 15 जण होते, त्यामध्ये 2 क्रू मेंबर्स आणि 13 प्रवासी समाविष्ट होते.

स्थानिक नागरिकांनी सर्वप्रथम प्रशासनाला कळवले की विमान क्यूरासिका नावाच्या भागात कोसळले आहे. त्यानंतर तातडीने प्रवाशांची स्थिती जाणून घेण्यासाठी बचाव पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. मात्र, पथक तेथे पोहोचल्यावर कोलंबियाच्या परिवहन मंत्रालयाने स्पष्ट केले की या अपघातात कोणताही प्रवासी किंवा क्रू मेंबर जिवंत बचावलेला नाही.विमानाचा नोंदणी क्रमांक HK4709 असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा अपघात तांत्रिक बिघाड, हवामानाची परिस्थिती किंवा इतर कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास संबंधित तपास यंत्रणा करणार आहेत.

या विमानातील प्रवासी: मारिया अल्वारेज बारबोसा, कार्लोस साल्सेडो, रोलांडो पेनेलोजा ग्वाल्ड्रोन, मारिया दियाझ रोड्रिगेझ, मायरा एवेंडानो रिनकॉन, अनायसेल क्विंटेरो, करें पॅरालेस वेरा, एनिरली जुलियो ओसोरियो, गिनेत रिनकॉन, डायोजेनीस क्विंटेरो अमाया, नतालिया अकोस्टा साल्सेडो, मायरा सांचेज क्रिएदो, जुआन पाचेको मेजिया तर क्रू मेंबर्स: कॅप्टन मिगेल वेनेगास, कॅप्टन जोस दे ला वेगा या सर्वांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

प्रवाशांमध्ये डायोजेनीस क्विंटेरो हे एक महत्त्वाचे नाव होते. ते आपल्या परिसरातील अंतर्गत सशस्त्र संघर्षाच्या पीडितांचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या मृत्यूमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुःख आणि चिंता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande