
अजित पवारांच्या अपघाती निधनावर दिले स्पष्टीकरण
बारामती, 28 जानेवारी (हिं.स.) । उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर विरोधकांकडून व्यक्त होणारा संशय आणि चर्चांना शरद पवारांनी पूर्णविराम दिलाय. अजित पवारांचा मृत्यू निव्वळ अपघात असून याला राजकीय रंग देऊ नये असे कळकळीचे आवाहन त्यांनी केलेय. यावेळी त्यांना अश्रु अनावर झाले होते.
अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच शरद पवार दिल्लीहून बारामतीत दाखल झाले. बारामती विमानतळावर पोहोचताच त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. धावपट्टीवर उतरल्यानंतर त्यांनी अपघात कसा आणि कुठे घडला, याबाबत विचारणा केली. त्यावर, धावपट्टी संपण्यापूर्वी सुमारे एक किलोमीटर अंतरावर, बाजूच्या खोलगट भागात विमान कोसळल्याची माहिती त्यांना देण्यात आली. ही माहिती ऐकून शरद पवार काहीसे भावूक झाले.दरम्यान, अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्याही अश्रूंचा बांध फुटला. कुटुंबीयांचा दुःखद प्रसंग पाहून उपस्थितांनाही भावना आवरता आल्या नाहीत.
अजित पवारांच्या मृत्यूवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, जम्मू-काश्मीरचे उमर अब्दुल्ला यांच्यासह काही नेत्यांनी संशय व्यक्त करत घटनेच्या चौकशीची मागणी केली. यावरून प्रसिद्धी माध्यमांसह राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला पेव फुटले होते. यापार्श्वभूमीवर सर्व संशय आणि चर्चा फेटाळून लावत शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे. कर्तृत्ववान आणि निर्णयक्षम नेतृत्व आज राज्याने गमावले आहे. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही. काही माध्यमांमध्ये या अपघातामागे राजकारण असल्याचे दावे केले जात असल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या दुर्घटनेत कोणतेही राजकारण नाही. हा केवळ अपघात आहे. कृपया या दुःखद घटनेला राजकीय वळण देऊ नये असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी