
मुंबई, 28 जानेवारी, (हिं.स.)। झी मराठीवरील नवीन मालिका ‘शुभ श्रावणी’ प्रेक्षकांच्या भेटीस आली असून, या मालिकेतुन अभिनेता सुमित पाटील छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. ‘शुभंकर’ या जबाबदार, साध्या आणि प्रामाणिक तरुणाची भूमिका सुमित साकारत असून, आपल्या व्यक्तिरेखेची कथा, तयारी, निवड प्रक्रिया आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद याबद्दल त्याने मनमोकळेपणाने संवाद साधला. ‘शुभ श्रावणी’ या मालिकेत माझ्या व्यक्तिरेखेचं नाव शुभंकर आहे. शुभंकर आपल्या आई-वडिलांबरोबर आणि दोन बहिणींसोबत राहतो. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं असलं तरी तिला सासरी हुंड्यासाठी त्रास सहन करावा लागतो, तर लहान बहीण कॉलेजमध्ये शिकणारी, शिक्षणासाठी झटणारी आहे. वडील रिक्षाचालक असले तरी त्यांचा रिक्षा चालवण्यात फारसा रस नाही; त्यांना ज्योतिषशास्त्राची आवड असून अचानक श्रीमंत होण्याचं एक वेगळंच स्वप्न आहे. या सगळ्या परिस्थितीत शुभंकरसाठी सर्वात मोठा आधार म्हणजे त्याची आई. तिला माहीत आहे की तो मनाने अत्यंत शुद्ध आहे, घरासाठी आणि बहिणींसाठी प्रामाणिकपणे मेहनत घेतो.शुभंकरची एक प्रोफेशनल लाईफ देखील आहे.
तो कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या शिक्षणमंत्र्यांकडे काम करतो. साहेबांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तो त्यांच्यासाठी अत्यंत इमानदारीने काम करतो. त्याच्यासाठी साहेब म्हणजे देव, आणि त्यांचं घर म्हणजे मंदिर. मात्र साहेबांची मुलगी आणि त्यांच्यात एक वेगळी वैयक्तिक कथा आहे. साहेब जरी तिला दुर्लक्षित करत असले, तरी शुभंकर तिच्याशी सौम्यपणे वागतो, तिची काळजी घेतो , साहेबांची मुलगी म्हणून तिच्याविषयी आदर राखतो. मुळात घरच्या जबाबदाऱ्या, नोकरी, साहेबांची कामं, बहिणींचं भविष्य आणि कोणाचंही मन न दुखावण्याची वृत्ती. या सगळ्यांच्या तारेवरची कसरत म्हणजे शुभंकर. एक साधा, सगळ्यांना सांभाळून घेणारा आणि इमानदार. माझी या व्यक्तिरेखेसाठी निवड अशी झाली - मी ‘विषय हार्ड’ हा सिनेमा केला होता, जो महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाहिला गेला. त्यानंतर झी टॉकीजच्या ओरिजिनल सेगमेंटमधून मला कॉल आला आणि ‘पक्या पिंकीज साहेब’ हा चित्रपट मी झी टॉकीजसोबत केला. त्यानंतर झी मराठीकडून मला विचारण्यात आलं की, कोल्हापूरचीच एक सिरीयल करशील का? तेव्हा मला वाटलं आपल्याच घरच्या मातीतील कॅरेक्टर साकारायला मिळणं हे नशीब आहे. रोल आव्हानात्मक वाटला, पण तितकाच आकर्षकही वाटला. ऑडिशन्स पाठवल्यानंतर वल्लरीसोबत स्क्रीन टेस्ट, लुक टेस्ट झाली. झी मराठी आणि सोल प्रोडक्शन्सला ते आवडलं आणि संपूर्ण प्रक्रियेनंतर मी ही भूमिका स्वीकारली. शुभंकर हा शांत, संयमी स्वभावाचा आहे, तर मी स्वतः थोडासा अॅग्रेसिव्ह आहे. त्यामुळे ही भूमिका माझ्यापेक्षा थोडीशी अपोजिट आहे. त्यामुळे बॉडी लँग्वेज, वावर, शांतपणा यावर विशेष लक्ष द्यावं लागलं. सिनेमाची अभिनयाची भाषा वेगळी, नाटकाची वेगळी आणि मालिकेची वेगळी असते. मालिकेतील क्लोजअप्स, शॉट्स, भावनिक सीन यासाठी अभिनयाची वेगळी तयारी करावी लागली. शुभंकर राकट नाही, तर एक साधा, सामान्य तरुण आहे, हे सातत्याने जपण्यावर मी काम केलं. भाषेच्या बाबतीत कोल्हापुरी बोली ही माझी स्वतःची असल्यामुळे फार अडचण नाही, पण भावनिक संवादांसाठी थोडा रियाज करावा लागतो. माझ्या आधीच्या भूमिकांपेक्षा शुभंकरची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. आधीच्या पात्रांमध्ये बिनधास्तपणा दिसत होता, पण शुभंकर समजूतदार, नम्र आणि जबाबदार आहे. कुटुंबाची जबाबदारी, आर्थिक परिस्थिती सुधारण्याची इच्छा, साहेबांची कामे प्रामाणिकपणे पूर्ण करणे आणि त्यांच्या मुलीची काळजी घेणे. या सगळ्या गोष्टींमध्ये शुभंकर सतत संघर्ष करत असतो. साहेबांची बहीण अलखनंदा त्याच्यावर तिरस्कार करते, त्यामुळे त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. या संघर्षातून शुभंकर काय निर्णय घेईल, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरेल. मध्यमवर्गीय तरुणाची कथा असल्यामुळे प्रेक्षक या मालिकेशी सहज जोडले जातील.
‘शुभ श्रावणी’बद्दल माहिती मिळाल्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक होता. प्रोमोमुळेच माझ्या भूमिकेबद्दल अनेक सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. नवीन चाहत्यांची संख्या वाढली आणि सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झाला. प्रेक्षकांना शुभंकरची भूमिका वास्तववादी आणि रिलेटेबल वाटते. मालिकांसाठी प्रेक्षकांचा उत्साह अधिक असल्याचेही लक्षात आले. सेटवर सहकलाकार आणि टीममध्ये परस्पर आदराची भावना आहे. मालिकेतील आई-वडील आणि बहिणींच्या भूमिकेत असलेल्या कलाकारांसोबत पहिल्या दिवसापासून कौटुंबिक नातं तयार झाल्यासारखं वाटतं. सर्व कलाकार एकमेकांना भूमिका सुधारण्यासाठी मार्गदर्शन करतात आणि सतत सपोर्ट करतात. टीमचा सकारात्मक स्वभाव कामाला अधिक आनंददायी बनवतो आणि सर्वांसोबत मैत्री निर्माण झाली आहे.
२०२६ वर्षाबद्दल मला मोठ्या अपेक्षा आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात माझे दोन प्रोजेक्ट रिलीज होत आहेत ‘बिगी बिगी’ हे गाणं आणि माझा ड्रीम प्रोजेक्ट ‘शुभ श्रावणी’. या वर्षात माझ्या अभिनय आणि नृत्य कौशल्यात अधिक प्रगती व्हावी, माझे प्रोजेक्ट उच्च टीआरपी गाठावेत आणि ‘शुभ श्रावणी’ दीर्घकाळ चालावी, अशी माझी इच्छा आहे. हे वर्ष सर्वांसाठी यशस्वी आणि आनंददायी ठरो, अशी माझी भावना आहे.
तेव्हा पाहायला विसरू नका 'शुभ श्रावणी', दररोज संध्या ७ वाजता, फक्त झी मराठीवर.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर