इटलीतील सिसिलीमध्ये भयानक भूस्खलन; 1,500 लोकांचे स्थलांतर
रोम , 29 जानेवारी (हिं.स.)।दक्षिण इटलीतील सिसिली बेटावरील निस्केमी शहर सध्या भीषण संकटाचा सामना करत आहे. वादळ हेरीमुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे शहराचा मोठा भाग हळूहळू दरीकडे खचत आहे. त्यामुळे इटलीच्या नागरी संरक्षण विभागाने प्रभा
इटलीतील सिसिलीमध्ये भयानक भूस्खलन; 1,500 लोकांचे स्थलांतर


रोम , 29 जानेवारी (हिं.स.)।दक्षिण इटलीतील सिसिली बेटावरील निस्केमी शहर सध्या भीषण संकटाचा सामना करत आहे. वादळ हेरीमुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे शहराचा मोठा भाग हळूहळू दरीकडे खचत आहे. त्यामुळे इटलीच्या नागरी संरक्षण विभागाने प्रभावित भागातील रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची योजना आखली आहे.

सिसिली बेटावरील निस्केमी शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे सुमारे ४ किलोमीटर लांबीचा कडा कोसळला असून भूस्खलनाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. इटलीच्या नागरी संरक्षण विभागाने प्रभावित भागातील रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची योजना आखली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आतापर्यंत १,५०० हून अधिक लोकांना त्यांच्या घरातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सध्या कोणतीही मृत्यू किंवा जखमी झाल्याची माहिती नाही, मात्र परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दक्षिण-मध्य सिसिलीमध्ये वसलेले निस्केमी शहर एका पठारावर आहे, जे आता हळूहळू सपाट मैदानाकडे खचत आहे. उताराचे मोठे भाग कोसळल्यानंतर अनेक इमारती कड्याच्या टोकावर लटकलेल्या दिसत आहेत. एका कारचा पुढचा भागही दरीत घसरलेला आढळला आहे.नागरी संरक्षण विभागाचे प्रमुख फाबियो सिसिलियानो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, भूस्खलनग्रस्त भागातील अनेक घरे आता राहण्यायोग्य राहिलेली नाहीत. भूस्खलन अधूनमधून सुरूच असून प्रभावित नागरिकांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार आहे.

दरम्यान , सोमवारी पंतप्रधान जिओर्जिया मेलोनी यांच्या नेतृत्वाखालील इटालियन सरकारने सिसिली, सार्डिनिया आणि कॅलाब्रिया या तीन दक्षिणी प्रदेशांसाठी आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. मागील आठवड्यात आलेल्या भीषण वादळामुळे हे तिन्ही भाग मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande