उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन
- शासकीय इतमामात झाले पार्थिवावर अंत्यसंस्कार - अमित शहा, फडणवीसांसह मान्यवरांनी दिली श्रद्धांजली बारामती, 29 जानेवारी (हिं.स.) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज, गुरुवारी दुपारी 12 वाजता बारामतीमधील विद्या प्रतिष्ठा
अजित पवारांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह


- शासकीय इतमामात झाले पार्थिवावर अंत्यसंस्कार

- अमित शहा, फडणवीसांसह मान्यवरांनी दिली श्रद्धांजली

बारामती, 29 जानेवारी (हिं.स.) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज, गुरुवारी दुपारी 12 वाजता बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो कार्यकर्ते व समान्य नागरिक उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील बारामतीजवळ बुधवारी सकाळी खासगी विमान कोसळून झालेल्या अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरापर्यंत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यदर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तसेच गुरुवारी सकाळी काटेवाडी येथील निवासस्थानीही हजारो नागरिकांनी अंतिम दर्शन घेतले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कुटुंबीयांसह काटेवाडीत जाऊन अजित पवार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले व शरद पवार, सुनेत्रा पवार यांचे सांत्वन केले. श्रद्धांजलीनंतर पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. ‘अजित दादा अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी त्यांच्या पार्थिवाला मंत्रोच्चारात मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थित हजारो नागरिकांनी एकच वादा, अजित दादा…’, ‘अजित दादा अमर रहे…’ अशा गगनभेदी घोषणा देत भावना व्यक्त केल्या. विद्या प्रतिष्ठानचा परिसर शोकाकुल वातावरणाने भारावून गेला.

अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातून राजकीय नेते बारामतीमध्ये दाखल झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष नितीन नबिन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, छगन भुजबळ, खासदार शाहू महाराज छत्रपती, आंध्र प्रदेश सरकारमधील नारा लोकेश, गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे, माधुरी मिसाळ, नीलम गोऱ्हे, अदिती तटकरे, पंकजा मुंडे, गणेश नाईक, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, राहुल कुल, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जयकुमार गोरे, नरहरी झिरवळ, शिवेंद्रराजे भोसले, हर्षवर्धन पाटील, दत्तामामा भरणे, प्रफुल पटेल, रितेश देशमुख, मेधा कुलकर्णी, निवेदिता माने, अमोल कोल्हे, राजेश टोपे, सुरेश धस, संजय दिना पाटील, सचिन अहिर, मेघना बोर्डीकर, मकरंद पाटील, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा, प्रकाश आबिटकर, श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अजित पवार यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली अर्पण वाहिली.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande