
नवी दिल्ली, २९ जानेवारी (हिं.स.) बारामती (जि. पुणे) विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विमानातील इतर चार जणांचा बुधवारी मृत्यू झाला होता. या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स सापडल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले आहे. तपास सुरू आहे आणि निर्धारित वेळेत पूर्ण केला जाणार असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एक निवेदन जारी करून सांगितले की, अपघातानंतर सर्व आवश्यक प्रतिसाद आणि तपास यंत्रणा तात्काळ सक्रिय करण्यात आल्या आहेत. संपूर्ण, पारदर्शक आणि वेळेवर चौकशी करणे हे मंत्रालयाचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
मंत्रालयाने म्हटले आहे की, नवी दिल्लीस्थित विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) मधील तीन अधिकाऱ्यांची टीम आणि मुंबईस्थित नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) मधील तीन अधिकाऱ्यांची टीम अपघातस्थळी पोहोचली आहे. एएआयबीचे महासंचालक जी.व्ही.जी. युगंधर देखील काल घटनास्थळी पोहोचले. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे आणि तपास वेगाने सुरू आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मंत्रालय स्थापित मानक कार्यपद्धती आणि विहित मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्धारित वेळेत तपास पूर्ण करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे. ही चौकशी AAIB नियम, २०२५ च्या नियम ५ आणि ११ नुसार सुरू करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे