दिल्लीतील पाच शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी
नवी दिल्ली, 29 जानेवारी (हिं.स.)।दिल्लीतील पाच शाळांना गुरुवारी सकाळी बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. या धमक्यांनंतर संबंधित शाळांचे परिसर तातडीने रिकामे करण्यात आले असून, सुरक्षा यंत्रणांनी झडती मोहीम सुरू केली आहे. दिल्ली फायर सर्व
दिल्लीतील पाच शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी


नवी दिल्ली, 29 जानेवारी (हिं.स.)।दिल्लीतील पाच शाळांना गुरुवारी सकाळी बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. या धमक्यांनंतर संबंधित शाळांचे परिसर तातडीने रिकामे करण्यात आले असून, सुरक्षा यंत्रणांनी झडती मोहीम सुरू केली आहे.

दिल्ली फायर सर्व्हिसेसने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली कॅन्ट येथील लोरेटो कॉन्व्हेंट, चित्तरंजन पार्कमधील डॉन बॉस्को, तसेच आनंद निकेतन आणि द्वारका येथील कार्मेल कॉन्व्हेंट या शाळांना धमकी मिळाली आहे. याशिवाय, लोधी इस्टेटमधील सरदार पटेल विद्यालयाने विद्यार्थ्यांच्या पालकांना संदेश पाठवून संभाव्य सुरक्षाधोका असल्याची माहिती दिली.

धमकीची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन विभागाला तातडीने कळवण्यात आले. त्यानंतर शाळा रिकाम्या करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि अँटी-सॅबोटाज तपासणी करण्यात आली. दिल्ली फायर सर्व्हिसेसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आमच्या टीम्स घटनास्थळी उपस्थित आहेत आणि ठरवलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार तपास सुरू आहे. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही, मात्र झडती मोहीम सुरूच आहे.”

दरम्यान, सरदार पटेल विद्यालय प्रशासनाने पालकांना सांगितले की सकाळी सुरक्षेची धमकी मिळाल्यानंतर तातडीने अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने संपूर्ण शाळा परिसराची सखोल तपासणी केली. पालकांना पाठवलेल्या संदेशात सांगण्यात आले की, “हे सांगताना दिलासा वाटतो की परिसर पूर्णपणे सुरक्षित घोषित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे आणि सर्व आवश्यक सुरक्षा प्रोटोकॉल तत्काळ आणि जबाबदारीने राबवण्यात आले आहेत. आज शाळेतील वर्ग नेहमीप्रमाणे सुरू राहतील.”

पोलिस सूत्रांनी सांगितले की, स्थानिक पोलीस, बॉम्ब निरोधक पथक आणि डॉग स्क्वॉड शाळांच्या परिसरात तपासासाठी तैनात करण्यात आले आहेत. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. धमक्यांचा स्रोत शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande