
छत्रपती संभाजीनगर, 29 जानेवारी (हिं.स.)।
बीड जिल्ह्यातील सर्वात गाजलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराडच्या दोषमुक्तीबाबतच्या अपिलात हस्तक्षेपास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संदीपकुमार मोरे आणि न्या. आबासाहेब शिंदे यांनी नकार दिला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडने दोषमुक्तीसाठी अपील दाखल केले होते.
वाल्मीक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्याने कराडने उच्च न्यायालयात अपील केले होते. त्यात शासनातर्फे शपथपत्र दाखल करण्यात आले. अंबाजोगाई येथील विशेष न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषारोप निश्चित झाले. कराडने अपिलात अर्ज
दाखल करून दुरुस्तीची परवानगी मागितली. शासनातर्फे कराडच्या दुरुस्तीच्या अर्जास विरोध करणारे शपथपत्र दाखल केले. त्यात सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या निकालांनुसार दोषारोप निश्चित झाल्यानंतर दोषमुक्तीचा अर्ज निष्फळ ठरतो असे निदर्शनास आणून दिले दोषारोपपत्र दाखल झाल्यामुळे कराडचा दोषमुक्तीचा अर्ज निष्फळ ठरतो. त्याचे अपीलही निष्प्रभझाल्यामुळे ते फेटाळावे. दोषारोप निश्चितीच्या मुद्द्यातही दुरुस्ती करता येणार नाही, असे शासनाच्या वतीने निदर्शनास आणून देण्यात आले. खंडपीठाने सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या वरील निकालांचा संदर्भ देऊन कराडचे अपील निष्प्रभझाल्यामुळे हस्तक्षेपास नकार देण्याचा मनोदय व्यक्त केला. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. सचिन सलगरे, अॅड. पवन लखोटिया यांनी सहकार्य केले. कराडतर्फे अॅड. नीलेश घाणेकर यांनी काम पाहिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis