
रत्नागिरी, 29 जानेवारी, (हिं. स.) : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या समान किमान कार्यक्रमांतर्गत दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे “महिलांचे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण या विषयावर मार्गदर्शन सत्र पार पडले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद यशवंतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. संतोष विष्णू सावर्डेकर उपस्थित होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. पाटील यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा याबाबत सविस्तर माहिती दिली. लैंगिक छळ म्हणजे काय, कोणती कृत्ये लैंगिक छळाच्या व्याख्येत येतात, याविषयी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. कामाच्या ठिकाणी लैगिक छळ होत असल्यास महिलांनी कोणती पावले उचलावीत, तक्रार कशी करावी, याबाबतही माहिती दिली.
लैगिक छळ तक्रार निवारण समितीची रचना, तिची कार्यपद्धती व जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. मार्गदर्शनानंतर उपस्थित विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांचे शंकानिरसन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी व महिला कर्मचारी तसेच महिला व पुरुष शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी