
सोलापूर, 29 जानेवारी (हिं.स.)।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे आणि घरात कोणी सरकारी नोकरदार नाही, अशांसाठी आहे. पण, रोशन, किरण, शशी, माही अशा नावांचे हजारो लाभार्थी योजनेत आहेत. तशा नावांच्या महिला व पुरुष देखील आहेत. त्यामुळे आता अशा लाभार्थींच्या घरी जाऊन त्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी केली जाणार आहे.
राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या निर्णयानुसार सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे बंधनकारक होते. पण, लाखो महिला ३१ डिसेंबरच्या मुदतीत ई-केवायसी करू शकल्या नाहीत. ज्यांनी ई-केवायसी केली त्यापैकी अनेकांनी सरकारी नोकरदार असल्याचा पर्याय निवडला. त्यामुळे त्या महिलांच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरदार आहे का, याच्याही पडताळणीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपविली आहे. पडताळणीचा अहवाल काही दिवसांत सरकारला सादर करायचा आहे. दरम्यान, ‘ई-केवायसी’साठी काही दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशीही महिलांची मागणी आहे. तसेच चुकलेल्या ‘ई-केवायसी’तील दुरुस्तीसाठी देखील काही दिवसांची मुदत दिली जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड