
मुंबई, 29 जानेवारी (हिं.स.) - माघ पौर्णिमेच्या निमित्ताने (१ फेब्रुवारी) सौंदत्ती (बेळगाव) डोंगरावर होणार्या यात्रेसाठी भाविक येण्यास प्रारंभ झाला आहे. ही वर्षातील सर्वात मोठी यात्रा असून भाविकांची गर्दी लक्षात घेता या यात्रेसाठी १ सहस्र पोलीस आणि होमगार्डची नेमणूक करण्यात येणार आहे. यात्रेच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र वाहतूक आराखडा सिद्ध करण्यात आला असून रस्त्यावर ऐकरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
भाविकांसाठी शहराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली असून तेथून स्थानिक बससेवेद्वारे भाविकांना डोंगरावर जाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी, तसेच गर्दी नियंत्रणासाठी ‘बॅरिकेडस्’ लावण्यात आले असून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला यांच्यासाठी स्वतंत्र दर्शन रांग ठेवण्यात आली आहे. आरोग्य सुविधांच्या दृष्टीने डोंगरावर आणि पायथ्याशी तात्पुतरी वैद्यकीय केंद्र चालू करण्यात आली आहेत. आधुनिक वैद्य, परिचारिका, रुग्णवाहिका यांची २४ घंटे सोय करून देण्यात आली आहे. फिरती शौचालये, स्वच्छता कर्मचारी यांची नियुक्ती यांवर विशेष भर देण्यात आला आहे.
* कोल्हापूर येथे १९३ गाड्यांची नोंदणी !
कोल्हापूर येथूनही विविध मंदिरांमधून, तसेच स्थानिक मंडळे गटागटाने सौंदत्ती येथे जाण्याचे नियोजन करत आहेत. विशेषकरून ग्रामीण भागातून जाणार्या भाविकांची संख्या लक्षणीय असून आतापर्यंत १९३ गाड्यांची नोंदणी झाली आहे. कर्नाटक शासनाने ७०० गाड्यांची नोंदणी करण्याचे नियोजन केले आहे. तेथे जाणार्या भाविकांना सुविधा मिळाव्यात यांसाठी दोन मासांपूर्वी प्रशासनास पत्र दिले आहे, असे कोल्हापूर जिल्हा रेणुकाभक्त संघटनेचे श्री. युवराज मोळे यांनी सांगितले.
भाविकांना सोयी-सुविधा देण्याचा प्रशासनानाचा प्रयत्न ! - सिद्धू हुल्लोळी
या संदर्भात अधिक माहिती देतांना सौंदत्ती डोंगर येथील प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धू हुल्लोळी म्हणाले, ‘‘भाविकांच्या सोयीसाठी स्वच्छतेकडे अतिरिक्त लक्ष देण्यास सांगितले आहे. ३९ ठिकाणी अतिरिक्त पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ४१ ठिकाणी मोठे दिवे लावण्यात आले आहेत. येणार्या भाविकांना वाहने लावण्यास सुलभ व्हावे यांसाठी अ, ब आणि क अशी विभागणी करण्यात आली आहे. भाविकांना अधिकाधिक सोयी-सुविधा देण्याचा प्रशासनानाचा प्रयत्न आहे.’’
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी