
छत्रपती संभाजीनगर, 29 जानेवारी (हिं.स.)।
छत्रपती संभाजी नगर
महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी या निवडणुकांसाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून निवड केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेत येत्या १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
विभागीय आयुक्तांनी जाहीर केलेल्या आदेशानुसार, १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजतापासून या निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई प्रांतिक महानगरपालिका (महापौर, उपमहापौर) निवडणूक नियम २००५ आणि सुधारणा नियम २००६ मधील तरतुदींनुसार ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निवडीबाबतचे अधिकृत पत्र जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि नगरसचिव यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले आहे. शहराच्या प्रथम नागरिक पदासाठी कोणाची वर्णी लागते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis