
४-५ फेब्रुवारीला प्रवाशांचे हाल होणार
छत्रपती संभाजीनगर, 29 जानेवारी (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतपेट्या व निवडणूक साहित्य वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या २६५ बसची मागणी करण्यात आली आहे. ४ फेब्रुवारी रोजी मतपेट्या केंद्रांवर नेणे व ५ फेब्रुवारी रोजी त्या मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी एसटीकडे ही मागणी केली असल्याची माहिती मिळाली आहे.त्यामुळे ४, ५ फेब्रुवारीला बाहेरगावी जाताना प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६३ गट व पंचायत समितीचे १२६ गण क्षेत्रात निवडणूक होणार आहे.
तालुकानिहाय सोयगाव-३ गट, ६ गण; सिल्लोड-९ गट, १८ गण; कन्नड ८ गट, १६ गण; फुलंब्री-४ गट, ८ गण; खुलताबाद ३ गट, ६ गण; वैजापूर-८ गट, १६ गण; गंगापूर-९ गट, १८ गण; छत्रपती संभाजीनगर-१० गट, २० गण; पैठण ९ गट, १८ गण अशी एकूण ६३ गट व १२६ गणांची रचना आहे. प्रत्येक तालुक्यासाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी व एक सहायक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील २,२८२ मतदान केंद्रांवर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तालुकानिहाय मतदान केंद्रांमध्ये सोयगाव-११३, सिल्लोड-३०५, कन्नड-३१७, फुलंब्री-१५५, खुलताबाद-१०४, वैजापूर-२८१,
गंगापूर-३४७, छत्रपती संभाजीनगर -३५४ व पैठण-३०६ केंद्रांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हाभरातील या मतदान केंद्रावर बस लागणार असल्याने प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुकीसाठी १० हजार ४८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून, १२ हजार मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसेच सुमारे ५,०२४ मतदान यंत्रे व २,५१२ कंट्रोल युनिटची गरज भासणार आहे. ही यंत्रे नांदेड येथून मागविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis