


- चित्पावन शांडिल्य गोत्री जोशी स्नेहसंमेलनात फडणीस यांना 'कुलभूषण' पुरस्कार प्रदान
पुणे, ५ जानेवारी (हिं.स.) : ज्ञातींची होणारी कुलसंमेलने म्हणजे कुटुंबाचीच विस्तारित संकल्पना आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ हास्य -व्यंगचित्रकार शि.द. फडणीस (मूळचे चित्पावन शांडिल्य-आडनाव जोशी) यांनी रविवारी येथे केले.
महर्षी शांडिल्य प्रतिष्ठानने सुपर्ण मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या ४० व्या चित्पावन शांडिल्य गोत्री जोशी स्नेसंमेलनात ते बोलत होते. भूगर्भशास्त्र विषयात डॉॅक्टरेट पदवी मिळविलेले प्रा. संशोधक डॉ. मुकुंद जोशी संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित होते. महर्षी शांडिल्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष न.म. जोशी, उपाध्यक्ष वसंत जोशी आणि प्रतिष्ठानचे अन्य पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. मुकुंद जोशी, न.म. जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार फडणीस यांना प्रदान करण्यात आला.
शि. द. फडणीस (वय १०१) यांच्यासह महर्षी शांडिल्य प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष प. क. जोशी (वय ९७), रणजी, दुलिप व इराणी ट्रॉफी माजी क्रिकेटपटू, शिल्पकार,चित्रकार चंद्रशेखर गणेश जोशी (वय ९५) यांना 'कुलभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि ११ हजार १११ रुपयांचा धनादेश, असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
शतायुषी मार्गावर वाटचाल करणार न.म. जोशी, वसंत चिंतामणी जोशी, विष्णुपंत अनंत जोशी, प्रभाकर विष्णू जोशी यांनाही यावेळी 'कुलगौरव' पुरस्काराने गौरविण्यात आले. विष्णुपंत अनंत जोशींच्या वतीने त्यांच्या कन्या व सूनबाईने पुरस्कार स्वीकारला तर प्रभाकर विष्णू जोशी यांच्यावतीने त्यांचे पुतणे, संमेलनाध्यक्ष मुकुंद जोशी यांनी पुरस्कार स्वीकारला. शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. मुकुंद जोशी म्हणाले, विद्यार्थी असताना ज्या चंद्रशेखर गणेश जोशी यांचा क्रिकेटचा खेळ पाहिला त्यांचा सन्मान करण्याचे भाग्य मला लाभले. हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष न. म. जोशी म्हणाले, विशाल कुलाचा प्रमाणित आनंदोत्सव म्हणजे आपले आजचे स्नेसंमेलन आहे. माजी खासदार जगन्नाथराव जोशी यांनी, काटकसरी, बुद्धिवादी आणि स्पष्टवक्ता अशी चित्पावन ब्राह्मणांची वैशिष्ट्ये, गुण सांगितले होते. याचा अतिरेक झाला की चित्पावनांचे हे गुण अनुक्रमे कंजूष, तर्कवादी आणि फटकळपणाकडे झुकतात. हा अतिरेकीपणा आपण कमी केला पाहिजे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी