
नाशिक, 05 जानेवारी (हिं.स.)।
नाशिक महानगरपालिका निवडणुकीत महायुती फिस्कटली आहे. भाजप स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्रित निवडणूक लढवित आहेत. विरोधकांच्या महाविकास आघाडीशी सामना करण्यासोबतच राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीत सामना रंगत आहे. यानिमित्ताने भाजपचे संकटमोचक असलेले मंत्री गिरीश महाजन विरुद्ध शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्यात एक नंबरसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. यामुळे नाशिक मनपा निवडणुकीत ’भाऊ’ विरुद्ध ’दादा’ असा संघर्ष नागरिकांना बघायला मिळणार आहे.
दरम्यान, महाजन यांना पालकमंत्री केल्यानंतर शिवसेनेत नाराजी रंगली होती. त्यानंतर पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली. मात्र, वर्ष उलटून गेल्यानंतरही पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. त्याचप्रमाणे सिंहस्थ कुंभमेळा नियोजनात नाशिक जिल्ह्यातील मंत्र्यांना सहभागी करून घेतले जात नाही. उलट महाजन एककलमी सिंहस्थाची सर्व सूत्रे स्वतःच्या हातात ठेवत असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे तपोवन वृक्षतोडीच्या मुद्यावरदेखील शिवसेना शिंदेे गटाने वृक्षतोडीला विरोध करत मित्रपक्ष असलेल्या भाजपची कोंडी केली होती.भाजप नाशिक शहरात सर्वच बाजूंनी आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. परिणामी महायुतीतील घटक पक्षांत सुप्त संघर्ष निर्माण होत आहे. त्यातच मनपा निवडणुकीच्या वाटाघाटीतही महाजन यांनी महायुतीतील घटक पक्षांना योग्य प्रतिसाद दिला नसल्याची खदखद आहे. परिणामी मनपा निवडणुकीत महाजनांना टशन देण्यासाठी शिवसेनेचे ’दादा’ सज्ज झाले आहेत.भाजप युती करण्याच्या मनःस्थितीत नाही, हे लक्षात येताच मंत्री भुसे यांनी अॅक्टिव्ह होत सर्व सूत्रे आपल्या हातात घेत राष्ट्रवादी कॉँग्रेसशी युती केली. त्याचप्रमाणे विरोधी पक्षांसह भाजपतील नाराजांना हेरून तत्काळ पक्षात उमेदवारीही बहाल केली. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत नाराजीचा फायदा करून घेण्याचा शिवसेना शिंदे गटाचा कल दिसतो आहे.भाजपने नाशिक महापालिकेसाठी 118 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. शिवसेना शिंदे गटानेही 80 उमेदवार जो रिंगणात उतरवले आहेत. राज्यात एकत्र नांदत असणार्या दोन्ही पक्षांत सर्वाधिक जागा मिळविण्यासाठी स्पर्धा रंगणार आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत ’भाऊ’ विरुद्ध ’दादा’ रंगणार्या सामन्यात कोण यशस्वी होतंय, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV