
वनविभागाकडून तातडीच्या कारवाईची मागणी
रायगड, 07 जानेवारी (हिं.स.): रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील बोरघर–उसर परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याचे प्रकार समोर येत आहेत. माणगाव–तेळेगाव मार्गावर रात्री प्रवास करणाऱ्या अनेकांना अवघड वळणांजवळ बिबट्याचे दर्शन झाले असून, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बोरघर, आमडोशी, पेण, उसर, दहिवली आदी पंचक्रोशीतील गावांमध्ये या घटनेची चर्चा जोर धरू लागली आहे. काही प्रवाशांनी बिबट्याचे दर्शन मोबाईलमध्ये टिपले आणि व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर शेअर केले, ज्यामुळे दृश्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहेत. परिणामी या भागातील नागरिकांच्या व्हॉट्सॲप गटांवर बिबट्याच्या वावरासंदर्भातील पोस्ट आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत आणि नागरिकांची चिंता वाढली आहे.
माणगाव तालुक्याचे बोरघर, आमडोशी, पेण तसेच तळा तालुक्यातील उसर, दहिवली, भानंग, चरई, तळेगाव, वांजळोशी, वावे, काकल या गावांतील बहुतेक शेती जंगलालगत आहेत. शेतकऱ्यांना भातशेतीसाठी तसेच पाळीव जनावरांना चारण्यासाठी जंगल परिसरात दररोज जावे लागते. अशा परिस्थितीत बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, मजूर आणि ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यात जंगल परिसरात गस्त वाढवणे, सूचना फलक लावणे आणि नागरिकांना योग्य मार्गदर्शन देणे यांचा समावेश आहे. नागरिकांची अपेक्षा आहे की लवकरात लवकर ठोस कारवाई करून या परिसरातील लोकांना दिलासा दिला जावा.--------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके