
लातूर, 07 जानेवारी (हिं.स.) :भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लातूरमध्ये झालेल्या सभेत स्पष्टीकरण देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. “आमची लढाई काँग्रेस पक्षाशी आहे; मात्र माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे,” असे स्पष्ट मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील, असे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काँग्रेस पक्षाने या वक्तव्यावर जोरदार टीका केली होती. सर्वपक्षीय राजकारण्यांशी सलोख्याने वागणारे नेते म्हणून ओळख असलेल्या विलासराव देशमुख यांच्याविषयीची भाषा महाराष्ट्रातील अनेकांना खटकली होती. याचे पडसाद लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यताही वर्तवली जात होती.
या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “विलासराव देशमुख यांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. पक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांनी राज्यासाठी योगदान दिले. त्यामुळे त्यांच्या विषयी आदर व्यक्त करताना मला कोणताही संकोच नाही.”
लातूरच्या नेतृत्वपरंपरेचा उल्लेख करताना फडणवीस यांनी चाकूरकर साहेब, शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि विलासराव देशमुख यांचे योगदान अधोरेखित केले. “लातूरने महाराष्ट्राला मोठे नेतृत्व दिले आहे,” असे ते म्हणाले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, “आमच्या अध्यक्षांचे शब्द कदाचित चुकीच्या पद्धतीने मांडले गेले असतील. त्यांनी त्याबाबत दिलगिरीही व्यक्त केली आहे. मात्र पुन्हा एकदा स्पष्ट करतो—आमची राजकीय लढाई काँग्रेसशी आहे, विलासराव देशमुख यांच्याशी नाही.”
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर लातूरमधील नाराजी कितपत कमी होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis