
रासायनिक खतांचा तुटवडा नाही · तक्रारींसाठी तालुका, जिल्हास्तरीय कृषी कार्यालयाकडे संपर्क साधावा
लातूर, 05 जानेवारी (हिं.स.)। जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाच्या पेरण्या पूर्ण होवून पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. जिल्ह्यात रासायनिक खतांच्या संतुलित वापरासाठी विविध प्रकारच्या खतांचे ग्रेड आवश्यक त्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. जिल्ह्यामध्ये खतांची टंचाई परिस्थिती नाही, तरीही काही भागांमधून युरिया या खताच्या संदर्भामध्ये कृषी निविष्ठा विक्री केंद्रामध्ये युरिया खत उपलब्ध असताना शेतकऱ्यांना नाही म्हणणे, वाढीव दराने विक्री करणे व युरिया या खतासोबत इतर कृषी निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करणे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. शेतकऱ्यांना युरिया संदर्भामध्ये काही तक्रारी असतील त्यांनी तात्काळ तालुकास्तराव कृषी अधिकारी, गुण नियंत्रण यांच्याकडे किंवा जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी लातूर किंवा लातूर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये असणारा खतांचा साठा कृषी विभागाच्या https://adozplatur.blogspot.com/.../box-sizing-border-box... या ब्लॉगवर पाहता येईल. जिल्ह्यामध्ये युरिया या खताच्या 1 लाख 6 हजार 120 बॅग पॉस मशीननुसार कृषि केंद्रामध्ये उपलब्ध आहेत. तालुकानिहाय उपलब्ध युरिया खत बॅगमध्ये खालीलप्रमाणे राहतील-
अहमदपूर – 13 हजार 236 बॅग, औसा – 12 हजार 335 बॅग, चाकूर- 1 हजार 946, देवणी-4 हजार 808 बॅग, जळकोट -3 हजार 853 बॅग, लातूर -32 हजार 496 बॅग, निलंगा -14 हजार 809 बॅग, रेणापूर -6 हजार 457 बॅग, शिरुर अनंतपाळ -5 हजार 130 बॅग, उदगीर -11 हजार 50 बॅग.
तसेच जिल्ह्यामध्ये डीएपी-41 हजार 420 बॅग, एनपीकेएस-2 लाख 32 हजार 290 बॅग, एसएसपी 1 लाख 90 हजार 423 बॅग उपलब्ध असून रासायनिक खतांची कोणतीही कमतरता नाही. जिल्ह्यामध्ये कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी युरिया उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना न दिल्यास, जादा दराने विक्री केल्यास व युरिया सोबत लिंकिंगद्वारे इतर निविष्ठा दिल्यास संबंधित विक्रेत्यांवर खत नियंत्रण आदेश 1985 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित तालुक्यातील निरीक्षकांना लातूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिल्या आहेत. जिल्हास्तरीय भरारी पथकामार्फत लातूर जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांची वेळोवेळी तपासणी सुरु असून यापुढेही तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती लातूर जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी दिपक सुपेकर यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis