
अकोला, 08 जानेवारी (हिं.स.)। अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये तसेच मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने यांच्या मार्गदर्शनात आज दि. 8 जानेवारी 2026 रोजी अकोला महानगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे मनपा उपायुक्त विजय पारतवार यांच्याव्दारे मतदानाचा टक्केवारी मध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने मतदान केंद्र पर्यवेक्षक यांची मतदान चिठ्ठी वितरण संदर्भात बैठक संपन्न झाली आहे.
या बैठकीमध्ये अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अन्वये अकोला महानगरपालिका व्दारा विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत असून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेकरीता आवश्यक असलेल्या मतदान स्लीप वाटप करण्याचे कार्यही आवश्यक असून अकोला महानगरपालिकेच्या एकूण 20 प्रभागांसाठी मतदार यादीवर काम करणारे 50 पर्यवेक्षकांना तसेच त्यांच्या अधिनस्त 500 बी.एल.ओ. आणि 150 आशा वर्कर असे एकुण 650 कर्मचा-यांच्या माध्यमातून मतदान चिठ्ठी वितरण करण्यात येणार असून सदरचे काम दि. 9 जानेवारी पासून ते 13 जानेवारी 2026 पर्यंत पुर्ण करणे, तसेच या संदर्भात मतदारांना 100 टक्के सहकार्य करणे आदींबाबात सुचना मनपा उपायुक्त विजय पारतवार यांनी यावेळी दिली आहे. या बैठकीत मनपा उपायुक्त विजय पारतवार, निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे, छपाई साहित्य नोडल अधिकारी तथा शहर अभियान व्यवस्थापक संजय राजनकर, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनुप चौधरी, जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा यांचेसह सर्व पर्यवेक्षकांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे