
अकोला, 08 जानेवारी (हिं.स.)। अकोट नगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी एकत्र आलेल्या भाजप आणि एमआयएम या दोन्ही पक्षांनी अखेर युतीतून माघार घेतल्याचं जाहीर केलं आहे. या अनपेक्षित युतीमुळे राज्यभरात राजकीय चर्चा रंगली होती, मात्र आता दोन्ही पक्षांकडून युती तुटल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.या प्रकरणी भाजपकडून कडक भूमिका घेत अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत भाजपने पुढील कारवाईचे संकेत दिले आहेत.दरम्यान, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनीही स्पष्ट भूमिका मांडली आहे. वरिष्ठ नेतृत्वाला विश्वासात न घेता उमेदवारांनी किंवा स्थानिक नेत्यांनी युती केली असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.याच पार्श्वभूमीवर एमआयएम चे प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी यांनी अकोट विकास मंचला पत्र पाठवून बिनशर्त दिलेला पाठिंबा मागे घेतल्याचं जाहीर केलं आहे. या पत्रात पाठिंबा दिलेल्या पाचही नगरसेवकांची नावे नमूद करत, त्यांचा पाठिंबा परत घेत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.अकोट नगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या गणितात या घडामोडींमुळे मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला असून पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे