
ढाका, 08 जानेवारी (हिं.स.)।बांगलादेशमध्ये युवा नेते उस्मान हादी यांच्या हत्येनंतर निवडणूकपूर्व राजकीय हिंसा सुरूच आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी)च्या स्वयंसेवी शाखा ‘स्वेच्छासेवक दल’चे नेते अजीजुर रहमान मुसब्बीर यांची मंगळवारी रात्री हत्या करण्यात आली. पोलिस आणि पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी ढाकामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी मुसब्बीर यांची गोळ्या झाडून हत्या केली.
मीडिया रिपोर्टनुसार, बीएनपीच्या स्वयंसेवी शाखेचे महासचिव असलेल्या मुसब्बीर यांना मंगळवारी रात्री सुमारे 8.30 वाजता ढाकामधील कारवान बाजार परिसरातील सुपर स्टार हॉटेलजवळ अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घातल्या. ढाका महानगर पोलीस (तेजगांव झोन)चे अतिरिक्त उपायुक्त फजलुल करीम यांनी सांगितले की, त्यांना पंथापथ येथील बीआरबी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे पोहोचताच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
या हल्ल्यात सुफियान मसूद नावाचा आणखी एक व्यक्ती जखमी झाला असून ते तेजगांव पोलीस ठाणे वन कामगार संघटनेचे महासचिव आहेत. पक्षाच्या सदस्यांनी सांगितले की, मुसब्बीर यांनी संध्याकाळी सुपर स्टार हॉटेलमध्ये शरीयतपूर येथील रहिवाशांच्या एका गटासोबत आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यानंतर मुसब्बीर आणि मसूद जवळच्या एका गल्लीमधून चालत असताना दोन जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोर पायीच घटनास्थळावरून फरार झाले.
या घटनेनंतर स्थानिक बीएनपी कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या एका गटाने सोनारगाव चौकाजवळ निषेध आंदोलन केले. कुटुंबीय आणि पक्ष कार्यकर्त्यांनी सांगितले की, अवामी लीगच्या राजवटीत मुसब्बीर यांनी आपला बहुतेक काळ तुरुंगात घालवला होता आणि विविध राजकीय प्रकरणांमध्ये त्यांना वारंवार अटक करण्यात आली होती.
दरम्यान, आगामी 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी बांग्लादेशात हिंसाचार वाढत असल्याने मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, उस्मान हादी यांच्या कुटुंबीयांनीही निवडणुका पुढे ढकलण्यासाठी युनूस यांनीच हत्या घडवून आणल्याचा आरोप केला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode