
तेहरान, 09 जानेवारी (हिं.स.)। मध्य पूर्वेतील देश इराणमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. राजधानी तेहरानमध्ये गुरुवारी अचानक निदर्शने भडकली. देशाच्या निर्वासित युवराजांच्या आवाहनानंतर ही आंदोलने सुरू झाली असून, त्यानंतर तात्काळ इंटरनेट आणि फोन सेवा बंद करण्यात आल्या. तेहरान विमानतळही बंद करण्यात आले आहे आणि लष्कराला सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे.गुरुवारी रात्री लोकांनी आपल्या घरांच्या छतांवरून घोषणाबाजी केली आणि अनेक भागांत रस्त्यावर उतरून निदर्शने केली.
इराणचे निर्वासित युवराज रझा पहलवी यांच्या आवाहनानंतर देशात आंदोलनांना वेग आला आहे. गुरुवारी रात्री आठ वाजता लोकांनी घरांमधून, छतांवरून आणि रस्त्यांवर उतरून घोषणाबाजी केली. आंदोलकांनी हुकूमशाही आणि इस्लामिक प्रजासत्ताकाच्या विरोधात नारे दिले. पहलवी म्हणाले की, 'मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे कौतुक करतो. स्वतंत्र जगाचे नेते म्हणून, त्यांनी पुन्हा एकदा सरकारला जबाबदार धरण्याची गरज अधोरेखित केली आहे. आता वेळ आली आहे की इतरांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकावे, आपली शांतता मोडावी आणि इराणी लोकांच्या समर्थनात ठामपणे कारवाई करावी.'सुरक्षा यंत्रणा सतर्क असून ड्रोनद्वारे नजर ठेवली जात असल्याचे संकेतही मिळत आहेत.
प्रत्यक्षदर्शींनुसार, आंदोलन सुरू होताच इंटरनेट सेवा आणि दूरध्वनी लाईन्स तोडण्यात आल्या, त्यामुळे इराणचा बाह्य जगाशी संपर्क जवळपास तुटला. निर्वासित युवराजांच्या आवाहनाला इराणी जनता कितपत प्रतिसाद देते, याची ही पहिली मोठी चाचणी मानली जात आहे. रझा पहलवी यांचे वडील, इराणचे शेवटचे शाह, 1979 च्या इस्लामिक क्रांतीच्या थोड्याच आधी देश सोडून गेले होते. या निदर्शनांदरम्यान शाहांच्या समर्थनार्थही घोषणा देण्यात आल्या, ज्या कधी काळी मृत्युदंडाचे कारण ठरू शकत होत्या. ही नाराजी प्रामुख्याने इराणच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
बुधवारपासून सुरू झालेली ही आंदोलने केवळ राजधानीपुरती मर्यादित राहिली नाहीत. देशातील अनेक शहरे आणि गावांमध्ये बाजारपेठा बंद राहिल्या. आंदोलकांच्या समर्थनार्थ व्यापाऱ्यांनी कामकाज ठप्प ठेवले. मानवाधिकार संघटनांच्या माहितीनुसार, आतापर्यंत किमान 39 जणांचा मृत्यू झाला असून 2,260 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. वाढत्या विरोधामुळे सरकारवर आणि सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्यावर दबाव सातत्याने वाढत आहे.
इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सध्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याकडे तेहरानचे लक्ष लागले आहे. ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की इराणमध्ये शांततामय आंदोलकांची हिंसक हत्या झाली तर अमेरिका गप्प बसणार नाही. याच कारणामुळे इराणी अधिकारी सध्या पूर्ण ताकदीने कारवाई करण्यापासून दूर राहात असल्याचे दिसते. मात्र इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांच्या वक्तव्याला दांभिक असल्याचे म्हटले आहे. राजधानी तेहरानसह अनेक भागांत परिस्थिती तणावपूर्ण असून सरकारवर आंतरराष्ट्रीय दबावही वाढत आहे.
इराणमधील सध्याची आंदोलने 2022 मध्ये महसा अमीनी यांच्या मृत्यूनंतर झालेल्या आंदोलनांनंतरची सर्वात मोठी मानली जात आहेत. मात्र ही चळवळ कोणत्याही एका नेत्याच्या नेतृत्वाखाली नाही. अनेक ठिकाणी शाहांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या, पण हे समर्थन युवराज रझा पहलवी यांच्यासाठी आहे की 1979 च्या इस्लामिक क्रांतीपूर्व काळाच्या आठवणीपुरते मर्यादित आहे, हे अद्याप स्पष्ट नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode