
नवी दिल्ली, 09 जानेवारी (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी गुजरात मधील अहमदाबाद येथे जर्मनीचे फेडरल चॅन्सलर, फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणावरून जर्मनीचे फेडरल चॅन्सलर, फ्रिडरिक मर्झ 12 आणि13 जानेवारी 2026 दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. चॅन्सलर मर्झ यांचा हा भारताचा पहिला अधिकृत दौरा असेल.
पंतप्रधान मोदी आणि चॅन्सलर मर्झ 12 जानेवारी रोजी सकाळी सुमारे साडेनऊ वाजता साबरमती आश्रमाला भेट देतील. त्यानंतर सकाळी सुमारे 10 वाजता साबरमती नदीतट परिसरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात ते सहभागी होतील. यानंतर सकाळी सव्वा आकरा वाजल्यापासून गांधीनगर येथील महात्मा मंदिरात द्विपक्षीय बैठक होतील.
भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारीने अलीकडेच 25 वर्षे पूर्ण केली असून, या भागीदारीअंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा दोन्ही नेते घेतील. व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, कौशल्य विकास आणि गतिशीलता या क्षेत्रांतील सहकार्य अधिक दृढ करण्यावर चर्चा होईल. तसेच संरक्षण आणि सुरक्षा, विज्ञान, नवोन्मेष व संशोधन, हरित व शाश्वत विकास तसेच लोकांमधील परस्पर संबंध या महत्त्वाच्या क्षेत्रांतील सहकार्य पुढे नेण्यावरही भर दिला जाईल. पंतप्रधान मोदी आणि चॅन्सलर मर्झ प्रादेशिक तसेच जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण करतील. याशिवाय, दोन्ही देशांतील व्यापार व उद्योग क्षेत्रातील नेत्यांशीही ते संवाद साधतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule