
नवी दिल्ली, 09 जानेवारी (हिं.स.)। प्रवर्तन संचालनालयाच्या (ईडी) छापेमारीच्या विरोधात तृणमूल काँग्रेसच्या आंदोलनावर भारतीय जनता पक्षाने (भाजपा) टीका केली आहे. भाजपा नेते आणि खासदार रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले की, ममता बॅनर्जी बंगालमध्ये कोणतीही चौकशी होऊ देत नाहीत. त्या एवढ्या घाबरतात का? त्यांनी ममतांवर ईडीच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोपही केला.
भाजपा मुख्यालयात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रवीशंकर प्रसाद म्हणाले की, स्वतंत्र भारताच्या इतिहासात पश्चिम बंगालमध्ये जे घडले, ते यापूर्वी कधीच झाले नाही. एका खाजगी मालमत्तेत, जिथे ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई सुरू होती, तिथे एक विद्यमान मुख्यमंत्री पोहोचतात आणि ईडीच्या लोकांना धमकावतात आणि कागद हिसकावून घेऊन निघून जातात.
ते म्हणाले की, कोळशाची तस्करी आणि हवाला व्यवहार प्रकरणी ईडी कारवाई करत आहे, ज्याअंतर्गत अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. प्रतीक जैन यांच्या कन्सल्टन्सी फर्मबाबत अशी तक्रार आली होती की, येथून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. हे आम्ही म्हणत नाही, तर ईडीने आपल्या अधिकृत निवेदनात सांगितले आहे, जे त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
ते म्हणाले की, बंगाल हा कोळशाच्या तस्करीचा मोठा हॉटस्पॉट झाला आहे, ज्यात सत्ताधारी पक्षाशी संबंधित लोकही सहभागी आहेत. हा छापा ना बॅनर्जींच्या घरावर होता, ना त्यांच्या कार्यालयावर, ना टीएमसीच्या कार्यालयावर आणि ना टीएमसीच्या कोणत्याही नेत्याच्या किंवा मंत्र्याच्या घरावर. हा छापा एका खाजगी कन्सल्टन्सी फर्मवर टाकण्यात आला होता, जिथे कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगची तक्रार नोंदवली गेली होती. अशा वेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तिथे जातात, त्यांचे पोलीस अधिकारी जातात, ईडीच्या लोकांना धमकावतात, ममता बॅनर्जी त्यांच्याशी वाद करतात आणि कागद हिसकावून निघून जातात.
रवीशंकर प्रसाद म्हणाले की, त्यांचे वर्तन केवळ अमर्यादित, असंवैधानिक आणि लज्जास्पदच नाही, तर त्यांनी घटनात्मक मर्यादाही भंग केल्या आहेत. ममता जी, तुम्हाला एवढी घाई आणि भीती कसली? ममता बॅनर्जी वरिष्ठ नेत्या आहेत, १४ वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत, त्या केंद्रीय मंत्रीही राहिलेल्या आहेत आणि शासनव्यवस्था समजतात.
ते पुढे म्हणाले की, जर त्यांनी सर्व नियम, कायदे आणि लोकशाहीच्या मर्यादा तोडून तिथे जाणे आवश्यक समजले असेल, तर तिथे काहीतरी संशयास्पद होते, जे काढून टाकणे त्यांना गरजेचे वाटले. ममता जींनी असा काही करार केला आहे का की, बंगालमध्ये कोणतीही चौकशी होऊ देणार नाहीत? बंगालमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत सीबीआय आणि ईडीची चौकशी होऊ देणार नाहीत, कारण सर्वत्र त्यांच्या प्रणालीची मुळे रुजलेली आहेत. आम्ही याची कडाडून निंदा करतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule