
मुंबई, 09 जानेवारी (हिं.स.) - उद्धवसेनेशी हात मिळवणी करणे ही मनसेची सर्वांत मोठी चूक आहे. या आघाडीमध्ये सर्वाधिक नुकसान मनसेचे होईल. राज ठाकरे हे फक्त पराभूत होणार नाहीत, तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील. निकाल आल्यानंतर तुम्ही पाहा, अशी भविष्यवाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
भाजपा आणि एकनाथ शिंदे घट्ट मित्र आहोत. मनसेला मदत करण्याची आमची मानसिकता नाही. पण राज ठाकरे आणि मी, आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. सध्या प्रचार सुरू असल्याने ते माझ्या विरोधात बोलतात, मी त्यांच्या विरोधात बोलतो. पण ते शत्रू नाहीत, केवळ राजकीय विरोधक आहेत. १६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते. पण विचारांचा वारसा मिळत नाही. यांना विचारांचा वारसा मिळालेला नाही, अशी टीकाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. त्याला काहीच अर्थ उरलेला नाही. जर 2009 मध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र आले असते, तर आजची राजकीय परिस्थिती वेगळी असती. त्या काळातच त्यांना मत मिळाली असती. आता त्यांच्याकडे मतचं राहिलेली नाही. जिथपर्यंत राज ठाकरेंचा प्रश्न आहे, मी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतो, या निवडणुकीनंतर राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव होणार आहे. या युतीत राज ठाकरेंना काहीही फायदा होणार नाही. राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फायदा होईल, मात्र उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फायदा होणार नाही. राज ठाकरे हे फक्त पराभूत होणार नाहीत, तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील, ही मी भविष्यवाणी करतो, तुम्ही निकालानंतर पाहा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्याशी आमच्या पक्षाचे इतके टोकाचे भांडण झाल्यावरही मी आणि ते समोरासमोर आलो की एकमेकांशी बोलतो, सोबत चहा पितो. ही आपली राजकीय संस्कृती आहे. कारण हे लोक शत्रू नाहीत, तर राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे त्यांच्या नीतीचा आणि वृत्तीचा मी टोकाचा विरोध करणार आणि सत्ता मिळवणार. २०१९ मध्ये आमच्यासोबत विश्वासघात झाला होता. नंतर एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले आणि आमची महायुती अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही अजित पवारांना सोबत घेतले. आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी दिली. २०१९ मध्ये आमच्यासोबत जो विश्वासघात झाला, त्याला हे एकप्रकारे आम्ही हे उत्तर दिले. मुंबईत ठाकरे बंधू सध्या वेगळ्या पद्धतीची रणनीती आखत आहेत. सकाळी एक वाद सुरू करायचा आणि त्यावर दिवसभर चर्चा घडवून आणायची अशी त्यांची रणनीती दिसून येते. असे जेव्हा घडते तेव्हा दिवसभर त्या वादाभोवती सगळ्या चर्चा सुरु राहतात. त्यामुळे विकासावर कुणीच बोलत नाही. कारण या सर्वांना माहिती आहे की, जर निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढली गेली किंवा विकासाच्या गोष्टी बोलाव्या लागल्या, तर हे लोक निरुत्तर होतील.
विरोधी पक्ष ठेवायचाच नाही असा आमचा विचार नाही. विरोधी पक्षाची हल्ली मानसिकताच नाही. विरोधात कधीतरी बसावे लागू शकते, संघर्ष करावा लागू शकतो, असा यांचा विचारच नसतो. संघर्षासाठी रस्त्यावर उतरावे लागते, स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावावी लागते ही त्यांची मानसिकता नाही. हे लोक घरात बसून सारं काही करू इच्छितात. त्यामुळे त्यांचे कार्यकर्तेही निराश आहेत, असेही फडणवीसांनी सुनावले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी