
छत्रपती संभाजीनगर, 08 जानेवारी (हिं.स.)।
वाळूज महानगर-१ येथील साऊथ सिटीतील नागरिकांच्या पाणी पुरवठयासंदर्भातील वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन तिसगाव ग्रामपंचायत पदाधिकारी व सिडको प्रशासकांची बैठक पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून नव्याने सव्वा तास पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पूर्वी पाऊणतासऐवजी आता वाढीव पाणीपुरवठा करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले आहे.
नागरी भागात पूर्वी अत्यंत कमी दाबाने केवळ पाऊणतास पाणी पुरवठा करण्यात येत होता. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असे. तसेच पाणी अत्यंत कमी दाबाने व कमी वेळात येत असल्याने खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत होते. यामुळे नागरिकांनी वेळोवेळी तिसगाव
ग्रामपंचायतकडे अधिक पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन, ग्रामपंचायतने बुधवारी सिडको प्रशासक भुजंग गायकवाड यांच्यासोबत बैठक घेऊन, पथदिवे व रस्ता दुरुस्ती आदी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन, वाढीव पाणीपुरवठ्याची मागणी केली. यावेळी प्रशासक भुजंग गायकवाड यांनी सहायक कार्यकारी अभियंता मारूती वावरे यांना वाढीव पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले. यामुळे आता येथील पाणी पुरवठा हा १ तास १० मिनिटे असा जेमतेम सव्वा तास होणार आहे. यावेळी बैठकीला माजी सरपंच संजय जाधव, माजी उपसरपंच नागेश कुठारे, लालचंद कसुरे, ग्रामपंचायत अधिकारी शितल उमप, विनया बारसे, शिवाजी हिवाळे आदींची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis