
लातूर, 09 जानेवारी (हिं.स.)। उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत वर्षभरातील विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
उपजिल्हाधिकारी ठाकूर यांनी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व त्यांच्या परिसरात तंबाखूचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश दिले. कोपटा 2003 कायद्यानुसार कार्यालय प्रमुखांनी दंडात्मक कारवाई करून आपले कार्यालय तंबाखूमुक्त ठेवावे, असे आवाहन श्रीमती ठाकूर यांनी केले. तसेच, जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना तंबाखूमुक्त करण्यावर भर देण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शालेय प्रशासनाने प्रयत्न करावेत आणि तंबाखूमुक्त शाळेचे निकष पूर्ण करावेत, अशा सूचना शिक्षण अधिकारी व शिक्षण विभागाला देण्यात आल्या.
बैठकीला पोलीस उपाधीक्षक दिलीप सगर, सहाय्यक आयुक्त (अन्न व औषधी प्रशासन) प्रशांत काकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरुरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शंकर भारती, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, डॉ. आनंद कलमे, विक्रीकर अधिकारी श्री. सुरवसे तसेच सर्व तालुकास्तरीय गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis