
रायगड, 09 जानेवारी (हिं.स.)। रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून सुरक्षित वाहतुकीचा संदेश घराघरात पोहोचविण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवीचापाडा येथे नवीन पनवेल वाहतूक शाखेतर्फे वाहतूक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमावेळी पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रस्ते सुरक्षा हा पर्याय नसून ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर अनिवार्य असून चारचाकी वाहन चालवताना सीटबेल्ट लावणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वेगमर्यादेचे पालन करणे, धोकादायक पद्धतीने वाहन न चालवणे, ओव्हरटेक टाळणे, वाहतूक सिग्नल व नियमांचे काटेकोर पालन करणे याबाबत सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच वाहतूक नियमांची सवय लागल्यास भविष्यात अपघात टाळता येतात, असे नमूद करून त्यांनी पादचाऱ्यांसाठी असलेल्या नियमांचीही माहिती दिली. रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर करणे, रस्त्यावर खेळू नये, तसेच वाहनांच्या हॉर्नचा अनावश्यक वापर टाळावा, अशा महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी सध्याच्या काळात वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ऑनलाईन फसवणूक, अज्ञात लिंक, कॉल किंवा संदेशांपासून सावध राहण्याचा सल्ला देत सायबर क्राईमपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमास पोलीस हवालदार संतोष पाटील, शाळेतील शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जनजागृती कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण होऊन सुरक्षित वाहतुकीचा संदेश समाजात पोहोचण्यास मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके