
मॉस्को , 08 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेने रशियन ध्वज असलेला ‘मेरिनेरा’ हा तेलवाहू टँकर जप्त केल्यानंतर अटलांटिक महासागरात दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. रशियाने अमेरिकेच्या या कारवाईला थेट समुद्री दरोडा असल्याचे म्हटले आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ज्या समुद्री भागात हे ऑपरेशन राबवण्यात आले, त्या ठिकाणी रशियन पाणबुडीसह युद्धनौकाही उपस्थित होत्या.
रशियाच्या परिवहन मंत्रालयाने सांगितले की, यूएस नेव्हीने टँकरवर चढाई केल्यापासून जहाजाशी संपर्क तुटला आहे. दरम्यान, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की ‘मेरिनेरा’ टँकरवर अमेरिकन सैन्याच्या उतरण्यावर ते बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मॉस्कोने टँकरवरील चालक दलामध्ये असलेल्या रशियन नागरिकांविषयी तातडीने माहिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, रशियन नागरिकांशी मानवी आणि सन्मानपूर्वक वागणूक दिली जावी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण सुनिश्चित केले जावे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. जहाजावरील रशियन नागरिकांना लवकरात लवकर परत पाठवण्यात अमेरिकेला कोणतीही अडचण येऊ नये, असेही रशियाने स्पष्ट केले.
रशियाच्या परिवहन मंत्रालयाने म्हटले की, “1982 च्या संयुक्त राष्ट्र समुद्र कायद्यानुसार (यूएनसीएलओएस), कोणत्याही राज्याला इतर देशांच्या अधिकारक्षेत्रात कायदेशीररीत्या नोंदणीकृत जहाजांविरुद्ध बळाचा वापर करण्याचा अधिकार नाही.” राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे निकटवर्तीय खासदार आंद्रेई क्लिशास यांनी अमेरिकेने टँकर ताब्यात घेणे म्हणजे सरळसरळ समुद्री दरोडा असल्याचे सांगितले.तर या अमेरिकन मोहिमेला ब्रिटनने पाठिंबा दिला आहे. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, रॉयल एअर फोर्समार्फत पाळत ठेवून अमेरिकन ऑपरेशनला मदत करण्यात आली. हा निर्णय आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत घेतल्याचा दावा ब्रिटनने केला आहे.
अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, उत्तर अटलांटिक आणि कॅरिबियन समुद्रात सलग दोन कारवायांमध्ये वेनेझुएलाशी संबंधित दोन निर्बंधित तेलवाहू टँकर जप्त करण्यात आले आहेत. त्यापैकी एका टँकरवर रशियन ध्वज होता. वेनेझुएलाशी संबंधित आणखी एक टँकर अमेरिकन कोस्ट गार्डला चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला. अमेरिकेच्या होम डिपार्टमेंटच्या सचिव क्रिस्टी नोएम यांनी सांगितले, “यूएस कोस्ट गार्डच्या पथकाने ‘शॅडो फ्लीट’मधील बेला-1 आणि सोफिया हे दोन टँकर जप्त केले आहेत. पाठलागादरम्यान या टँकरने आपला ध्वज बदलला तसेच जहाजावर नवीन नावही लिहून घेतले.”
अमेरिकेने सांगितले की, अध्यक्ष ट्रम्प ‘निवडक’ पद्धतीने निर्बंध शिथिल करून वेनेझुएलाच्या तेलाची जागतिक बाजारात विक्री आणि वाहतूक सुलभ करतील. अहवालानुसार, एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, रशियन टँकर पकडण्याची ही कारवाई एका रात्रीत यशस्वी झालेली नव्हती, तर त्यासाठी अनेक आठवड्यांची मेहनत घेण्यात आली होती. व्हाइट हाऊसचे उपप्रमुख (डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ) स्टीफन मिलर यांनी सोशल मीडियावर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “अमेरिकेच्या कायद्यांनुसार आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या हिताशी सुसंगत असेल, त्यालाच समुद्री ऊर्जा वाहतुकीची परवानगी दिली जाईल.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode