
मुंबई, 08 जानेवारी (हिं.स.) : वरळी शिवडी आणि सायन कोळीवाडा या प्रभागात प्रचार रॅली करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुनर्विकास, घरकुल आणि संक्रमण शिबिरांतील नागरिकांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली. सायन कोळीवाडा येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या प्रचार दौऱ्यांना जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
वरळी येथून सुरू झालेल्या ही प्रचार रॅली, वरळी पोलिस कॅम्प, बिडीडी चाळ, जांबोरी मैदान, वरळी नाका, डॉ. ई मेजेस रोड, ना. म. जोशी मार्ग येथून पुढे भारत माता सिनेमा मार्गे शिवडी, शिवडी कोळीवाडा, कॉटन ग्रीन, शिवडी बिडीडी चाळ, काळाचौक्ती पोलिस चौकी मार्गे सायन कोळीवाडा अशी काढण्यात आली.
या प्रचार रॅलीची सायन येथे सभेद्वारे सांगता करण्यात आली यावेळी बोलताना, शिंदे म्हणाले की, मुंबईतील 20 हजार इमारतींना लवकरच ओसी (ऑक्युपेशन सर्टिफिकेट) देण्यात येणार असून नागरिकांना त्यांच्या हक्काचे कायमस्वरूपी घर त्यांच्या नावावर मिळेल. संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकार संवेदनशील असून गॅस पाइपलाइन, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांची कामे गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वेच्या जागेवरील पुनर्विकासाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांशी सातत्याने चर्चा सुरू आहे. प्रतीक्षानगर, सरदारनगर, सावित्रीबाई फुले नगर, सिद्धार्थ नगर आदी भागांतील एमआयजी इमारतींच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“घराच्या बदल्यात घर आणि तेही कायमस्वरूपी, हे प्रत्येक सामान्य माणसाचं स्वप्न असतं. बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं सर्वसामान्यांना हक्काचं घर देण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने आमचा प्रवास सुरू आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करत, येत्या निवडणुकीत जनतेचा कौल महायुतीच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास व्यक्त केला. मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
वरळी, शिवडी, सायन कोळीवाडा येथील विविध प्रभागात फिरताना नागरिकांचा आणि लाडक्या बहीण भावांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी