
तिरुअनंतपुरम, 09 जानेवारी (हिं.स.) : काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केरळ विधानसभा आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव (KLIBF) येथे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळ आणि योगदानावर आपले विचार मांडले. यावेळी ते म्हणाले की ते नेहरूंना भारतीय लोकशाहीचे संस्थापक मानतात, मात्र ते त्यांचे अंधभक्त नाहीत.
शशी थरूर यांनी भाजपवर टोला लगावत म्हटले की नेहरूंच्या चुका मान्य करणे आवश्यक आहे, पण देशातील प्रत्येक समस्येसाठी केवळ त्यांनाच दोष देणे अन्यायकारक आहे. ते म्हणाले की ते नेहरूंच्या विचारांचे आणि दृष्टिकोनाचे प्रशंसक आहेत आणि त्यांच्याविषयी त्यांना गाढ आदर आहे, जरी त्यांच्या सर्व विचारांशी आणि धोरणांशी ते पूर्णपणे सहमत नसले तरीही.
थरूर म्हणाले, “जवाहरलाल नेहरू यांनी अनेक अशी कामे केली आहेत ज्यासाठी ते अत्यंत प्रशंसेस पात्र आहेत. त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे भारतात लोकशाहीची भक्कम पायाभरणी त्यांनी केली.” त्यांनी स्पष्ट केले की सध्याचे मोदी सरकार लोकशाहीविरोधी आहे असे ते म्हणणार नाहीत, पण त्यांचा कल नक्कीच नेहरूविरोधी आहे. त्यांच्या मते, मोदी सरकारने नेहरूंना सोयीस्कर बळीचा बकरा बनवले आहे.
नेहरूंवरील टीका स्वीकारताना थरूर म्हणाले की काही बाबींमध्ये नेहरूंच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येऊ शकते. उदाहरणार्थ, त्यांनी 1962 साली चीनविरुद्ध भारताला झालेल्या पराभवाचा उल्लेख केला आणि त्यासाठी नेहरूंच्या काही निर्णयांना जबाबदार धरले जाऊ शकते, असे सांगितले. यासोबतच भाजपला टोला लगावताना ते म्हणाले की आजच्या राजकारणात परिस्थिती अशी झाली आहे की कोणताही मुद्दा असो, प्रत्येक गोष्टीसाठी नेहरूंनाच दोष दिला जातो अशी खंत थरुर यांनी व्यक्त केली.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी