
पश्चिम बंगालमधील ईडीच्या छाप्यांवरून घातला गोंधळ
नवी दिल्ली, 09 जानेवारी (हिं.स.) : पश्चिम बंगालमधील आय-पॅक कार्यालयावर ईडीने केलेल्या छाप्याच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. या आंदोलनात डेरेक ओ’ब्रायन, शताब्दी रॉय, महुआ मोइत्रा, बापी हलदर, साकेत गोखले, प्रतिमा मंडल, कीर्ती आझाद आणि डॉ. शर्मिला यांचा समावेश होता. गृह मंत्रालयाबाहेर धरणे आंदोलन करणाऱ्या या टीएमसी खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोळसा चोरी घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासाअंतर्गत ईडीने गुरुवारी कोलकात्यातील आय-पॅक कार्यालय आणि त्याचे संचालक प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी छापेमारी केली. ईडीने सॉल्ट लेक सेक्टर-5 येथील आय-पॅक कार्यालयात तपास अभियान राबवले. हे कार्यालय 2019 पासून तृणमूल काँग्रेससाठी राजकीय सल्लागार संस्था म्हणून काम करत आहे. तसेच ईडीच्या पथकांनी प्रतीक जैन यांच्या लाउडन स्ट्रीटवरील निवासस्थानीही झडती घेतली. ईडीच्या छाप्यादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मध्य कोलकात्यातील जैन यांच्या घरी पोहोचल्या. तेथून बाहेर पडताना त्यांच्याकडे काही कागदपत्रे आणि एक लॅपटॉप असल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी सांगितले की हे साहित्य तृणमूल काँग्रेसचे असून आगामी विधानसभा निवडणुकांशी संबंधित आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी सॉल्ट लेक येथील आय-पॅक कार्यालयातही गेल्या. त्यांच्या भेटीदरम्यान, त्यांच्यासोबत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना कार्यालयातून फायली आणि डायऱ्या काढून आपल्या सोबत घेऊन गेल्या.
या घटनाक्रमानंतर आज, शुक्रवारी टीएमसी खासदारांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तृणमूलच्या खासदारांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये डेरेक ओ’ब्रायन, शताब्दी रॉय, महुआ मोइत्रा यांचा समावेश आहे. दरम्यान टीएमसी खासदारांच्या या आंदोलनाचा भाजपतर्फे निषेध करण्यात आला आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी