
गांधीनगर , 09 जानेवारी (हिं.स.)।गुजरातमधील जेतपूर, धोराजी आणि उपलेटा पंथक परिसरात आज (शुक्रवारी) सकाळी सलग भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मोलॉजिकल रिसर्च (आयएसआर) यांच्या माहितीनुसार, गेल्या 12 तासांत या भागात एकूण 7 भूकंपीय धक्क्यांची नोंद झाली आहे.
आयएसआरच्या आकडेवारीनुसार, पहिला धक्का काल, गुरुवारी रात्री 8:43 वाजता जाणवला असून त्याची तीव्रता रिक्टर स्केलवर 3.3 इतकी होती. या भूकंपाचे केंद्र उपलेटा येथून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर होते. त्यानंतर आज पहाटे सर्वाधिक तीव्र धक्का सकाळी 6:19 वाजता नोंदवण्यात आला, ज्याची तीव्रता 3.8 इतकी होती.
भूकंपाच्या धक्क्यांची वेळ व तीव्रता : सकाळी 06:19 – 3.8 तीव्रता, सकाळी 06:56 – 2.9 तीव्रता, सकाळी 06:58 – 3.2 तीव्रता, सकाळी 07:10 – 2.9 तीव्रता, सकाळी 07:13 – 2.9 तीव्रता, सकाळी 07:33 – 2.7 तीव्रता, सकाळी 08:34 – पुन्हा एक हलका धक्का जाणवला.
मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व धक्क्यांचे केंद्र प्रामुख्याने उपलेटा येथून 27 ते 30 किलोमीटर पूर्व–उत्तर–पूर्व (ENE) दिशेला होते. भूकंपाची खोली जमिनीखाली 6.1 किलोमीटर ते 13.6 किलोमीटर दरम्यान मोजली गेली आहे.सुदैवाने आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या जीवित अथवा वित्तहानीची माहिती नाही. मात्र सलग धक्क्यांमुळे नागरिक घराबाहेर पडले असून परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
सतत जाणवत असलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे राजकोट जिल्ह्यातील धोराजी शहरात अनेक खासगी शाळांच्या व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून आज सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. सकाळी शाळेत पोहोचलेली मुलेही परत घरी पाठवण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode