
अकोला, 09 जानेवारी (हिं.स.)।
अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने आज दि. 9 जानेवारी 2026 रोजी मुख्य निवडणूक निरीक्षक अर्पित चौहान यांनी मनपा आयुक्त यांच्या दालनात आजपर्यंत झालेल्या नियोजनाबाबत तसेच तयारी बाबत आढावा सभा घेतली.
यावेळी मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.सुनिल लहाने यांच्याव्दारे मुख्य निवडणूक निरीक्षक अर्पित चौहान आणि सहा.निवडणूक अधिकारी ब्रिजेश पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त डॉ.लहाने यांनी पीपीटीच्या माध्यमातून अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मनपा प्रशासनाव्दारा करण्यात आलेले नियोजन आणि संपुर्ण मतदान प्रक्रियेसाठी नियोजित आराखडानुसार माहिती दिली.
तसेच यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक अर्पित चौहान यांनी आचार संहिता पथक, मतदान सी.यू.युनिट आणि बी.यू.यंनिट बाबत, स्ट्राँग रूम/मतमोजणी केंद्र आणि लागणारा मनुष्यबळ, संवेदनशील मतदार केंद्र, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मागणीनुसार बीयू युनीटचे 100 टक्के पुरवठा आदींबाबत माहिती घेतली. तसेच मतमोजणी प्रक्रिया 6 ठिकाणी होणार असून पत्रकारांना मतमोजणी संदर्भातील संपूर्ण माहिती एकत्रित एकाच ठिकाणावरून मिळावी याकरीता उपाययोजना करण्याकरिता मुख्य निवडणूक निरीक्षक यांनी निर्देश दिले.
यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, मुख्य निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी सतीष गावंडे मुख्याधिकारी तेल्हारा, तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी आदींची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे