
लातूर, 09 जानेवारी (हिं.स.)।
दिवंगत शिवराज पाटील चाकूरकर हे महान नेते होते. देशपातळीवर त्यांनी लातूरचा नावलौकिक केला. राजकीय क्षेत्रात नि:स्पृह व्यक्तीमत्व अत्यंत दुर्मिळ आहेत. या व्यक्तिमत्वाचा आदर म्हणून तसेच त्यांची स्मृती चिरंतन रहावी या हेतूने आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेली मागणी मान्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्मृतीस्थळ विकसित6 करण्याची घोषणा केली. भाजपाचे नेते असूनही दिवंगत चाकूरकरांच्या व्यक्तिमत्वाचा व नेतृत्वाचा त्यांनी सन्मान केला. हे फक्त भाजपाच करू शकते. अशा प्रतिक्रिया लातूरकरांमधून उमटत आहेत.
दिवंगत शिवराज पाटील चाकूरकर यांची पक्षनिष्ठा वादातीत होती. त्यांनी कधीही पक्ष बदलला नाही. भ्रष्टाचाराचा एकही आरोप उभ्या हयातीत त्यांच्यावर झाला नाही. देशात त्यांनी नेतृत्व केले. परंतु स्थानिक पातळीवर त्यांच्या वाट्याला उपेक्षाच आली. पक्षांतर्गत त्यांचे नेतृत्व मोठे होवू नये यासाठी अनेकदा प्रयत्न झाल्याचे सर्वांनी पाहिले. मृत्यूनंतरही काँग्रेसने या नेतृत्वाप्रती फारशी कृतज्ञता व्यक्त केली नाही. याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अवघ्या चार तासात अन्त्यदर्शन घेण्यासाठी अधिवेशन सोडून लातूरला आले. दोन दिवसांपूर्वी सभेसाठी लातुरला आल्यानंतर त्यांनी आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मागणीला प्रतिसाद देत राज्य सरकारच्या वतीने दिवंगत शिवराज पाटील चाकूरकर यांचे स्मृतीस्थळ उभारण्याची घोषणा केली. वास्तविक काँग्रेस पक्षाने ते करणे अपेक्षित होते.
या संदर्भात बोलताना शैलेश गोजमगुंडे म्हणाले की, चाकूरकर हे अभ्यासू आणि निष्कलंक नेतृत्व होते. जात, धर्म याच्या पलीकडे जावून एका विशिष्ट ध्येयाने व तत्वाने काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. मुख्यमंत्र्यांनी या नेतृत्वाचा योग्य सन्मान केला असून यामुळे लातूरकरांची छाती अभिमानाने फुगली आहे.
गणेश गवारे यांनी सांगितले की, दिवंगत चाकूरकर हे तरुणांपासून वृध्दांपर्यंत सर्वांसाठीच मार्गदर्शक होते.राजकारणासोबतच अध्यात्माचाही त्यांना गाढा आभ्यास होता. मुख्यमंत्र्यांनी स्मृतीस्थळ उभारण्याची घोषणा करत प्रत्यक्ष कृतीतून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.
शैलेश स्वामी यांनी सांगितले की, चाकूरकर लातूरचे होते ही आमची देशपातळीवर ओळख आहे. मुख्यमंत्र्यांनी व भाजपा सरकारने लातूकरांची ही ओळख अधिक दृढ केली आहे.
अॅड. दिपक मठपती म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आपल्या कृतीतून भारतीय जनता पक्षाने योग्य नेतृत्वाचा आदरच केला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेली विरोधी पक्षाच्या नेत्याचे स्मृतीस्थळ उभारण्याची घोषणा ही राज्य आणि देशपातळीवर एकमेव घटना ठरावी.
प्रेरणा होनराव यांनी मुख्यमंत्र्यांच्या भावनेला नतमस्तक होत त्यांनी समस्त लातूरकरांचा गौरव केला असल्याचे मत व्यक्त केले.
जी घोषणा काँग्रेसच्या नेत्यांनी करायला हवी होती ती भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी करून दाखवली. यावरून भाजपा हा एका तत्वाने राजकारण करणारा विशिष्ट विचारधारेचा पक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशा प्रतिक्रिया सामान्य जनतेतून उमटत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis