
नवी दिल्ली , 13 मार्च (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उशिरा रात्री इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्याशी पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दूरध्वनीवरून चर्चा केली. या संभाषणात पंतप्रधान मोदी यांनी वाढता तणाव, नागरिकांचे होत असलेले जीवितहानी आणि नागरी पायाभूत सुविधांना झालेल्या नुकसानीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. तसेच शांतता आणि स्थैर्याबाबत भारताची बांधिलकी त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.
इराणी राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम आशियातील संकट सोडवण्यासाठी संवाद आणि कूटनीतीचा मार्ग स्वीकारण्यावर भर दिला. भारतासाठी भारतीय नागरिकांची सुरक्षा, आवश्यक वस्तूंचा पुरवठा आणि ऊर्जा पुरवठा अखंडित राहणे ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, इराणी राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या चर्चेत त्यांनी प्रदेशातील गंभीर परिस्थितीवर चर्चा करताना वाढता तणाव आणि नागरिकांच्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केली. या संकटावर तोडगा काढण्यासाठी संवाद आणि कूटनीतीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच शांतता आणि स्थैर्याबाबत भारताची बांधिलकीही त्यांनी पुन्हा स्पष्ट केली.
गेल्या दहा दिवसांत पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम आशियातील अनेक देशांच्या नेत्यांशीही संवाद साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ओमान, कुवैत, बहरीन, सौदी अरेबिया, यूएई, जॉर्डन, इस्रायल आणि कतार या देशांच्या नेत्यांशीही संवाद साधला होता. त्यांच्या देशांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि काही देशांच्या सार्वभौमत्व व प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन झाल्याची निंदा केली. तसेच या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेबाबत आणि कल्याणाबाबतही त्यांनी चर्चा केली. खाडी आणि पश्चिम आशिया प्रदेशात सुमारे एक कोटी भारतीय राहतात. याशिवाय सुमारे १० हजार भारतीय इराणमध्ये राहतात, शिक्षण घेतात किंवा काम करतात, तर ४० हजारांहून अधिक भारतीय इस्रायलमध्ये वास्तव्यास आहेत.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ला केल्यानंतर पश्चिम आशियातील संकट अधिक तीव्र झाले आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इराणने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने इस्रायल तसेच खाडी प्रदेशातील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यांचा परिणाम दुबई आणि दोहा यांसारख्या जागतिक व्यापार आणि विमान वाहतूक केंद्रांच्या आसपासही दिसून आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode