
* बचत झालेला निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचे आवाहन
मुंबई, 01 ऑक्टोबर (हिं.स.) : राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आपल्या अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आगामी नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. या उत्सवांमधून बचत झालेला निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावा, असेही आवाहन त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना, सार्वजनिक मंडळांना आणि नागरिकांना केले आहे.
यंदा विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांत पावसाने ओढ दिल्यामुळे बहुतांश ठिकाणी दुष्काळाचे सावट पसरले आहे. निसर्गाच्या कोपामुळे उभी पिके करपून गेल्याने हजारो शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या बिकट परिस्थितीवर बोलताना राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क आमच्या बळीराजाचा आहे, या भूमिकेचा पुनरुच्चार शिंदे यांनी केला. अशा संकटकाळात महायुती सरकार आणि शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. शासकीय पातळीवर सर्वतोपरी मदतीच्या उपाययोजना सुरू आहेतच; परंतु एक समाज म्हणूनही प्रत्येकाने पुढे येऊन या परिस्थितीत योगदान देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकरी बांधव संकटात आणि चिंतेत असताना आगामी सण-उत्सव मोठ्या थाटामाटात व धुमधडाक्यात साजरे करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे सार्वजनिक मंडळे, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी उत्सव अगदी साधेपणाने साजरे करावेत. उत्सवांवर होणाऱ्या अवाढव्य खर्चाला फाटा देऊन वाचलेला निधी दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या थेट मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी वर्ग करावा, असे ते म्हणाले.
आपला अन्नदाता संकटात असताना आपण सर्वजण त्याच्या मदतीला धावून गेलो, तर या नैसर्गिक आपत्तीवर मात करणे सहज शक्य होईल. उत्सवाच्या खर्चात बचत करून जर आपण एका जरी शेतकऱ्याच्या डोळ्यांतील अश्रू पुसू शकलो आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकलो, तर तीच आदिशक्ती जगदंबेची खरीखुरी सेवा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी