ओडिशाचे मुख्य निवडणूक अधिकारी आर. एस. गोपालन यांची स्वेच्छानिवृत्ती
अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर केली व्हीआरएससाठी अर्ज भुवनेश्वर, 01 ऑक्टोबर (हिं.स.) : ओडिशाचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) आर. संतगोपालन (आर. एस. गोपालन) यांनी आपल्या शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेण्यासाठी अचानक अर्ज केला आहे.
व्ही.एस. गोपालन, ओडिशाचे मुख्य निवडणूक आयुक्त


अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर केली व्हीआरएससाठी अर्ज

भुवनेश्वर, 01 ऑक्टोबर (हिं.स.) : ओडिशाचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) आर. संतगोपालन (आर. एस. गोपालन) यांनी आपल्या शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेण्यासाठी अचानक अर्ज केला आहे. गोपालन यांच्या या निर्णयाची वेळ विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.

ओडिशात विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीवरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, या राजकीय घडामोडींशी आपल्या निर्णयाचा कोणताही संबंध नसल्याचे गोपालन यांनी स्पष्ट केले आहे. हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे घेतल्याचे त्यांनी सांगितले. गोपालन यांनी स्पष्ट केले की, गेल्या 2 सप्टेंबर रोजी माझ्या शासकीय सेवेला 25 वर्षे पूर्ण झाली. मतदारयादीशी संबंधित मुख्य काम पूर्ण झाल्यानंतर व्हीआरएससाठी अर्ज करण्याचा निर्णय मी यापूर्वीच घेतला होता. माझ्या या निर्णयामागे पूर्णपणे कौटुंबिक कारणे आहेत. भुवनेश्वरमध्येच राहून माझ्या मुलाच्या शालेय शिक्षणाकडे आणि कुटुंबाकडे लक्ष द्यायचे आहे असे त्यांनी सांगितले. दरम्यान, गोपालन यांच्या निर्णयाच्या वेळेबाबत प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

ओडिशामध्ये अंतिम मतदार यादी 21 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बिजू जनता दल (बीजेडी) आणि काँग्रेसने निवडणूक कार्यालयावर गंभीर आरोप केले होते.विरोधी पक्षांचा दावा आहे की, विशेष पुनरावलोकनाच्या प्रक्रियेदरम्यान राज्यातील 27.5 लाखांहून अधिक पात्र मतदारांची नावे मतदारयादीतून हेतुपुरस्सर वगळण्यात आली. या मुद्द्यावरून विरोधी पक्षांकडून गोपालन यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. विरोधी पक्षांच्या हल्ल्यांबाबत आणि राजीनाम्याच्या मागणीबाबत विचारले असता माझ्या या निर्णयामुळे त्यांना आनंद होत असेल, तर त्यांना आनंद होऊ द्या, असे गोपालन यांनी सांगितले.

जुलै 2024 मध्ये ओडिशाच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या आर. एस. गोपालन यांचा अधिकृत कार्यकाळ जून 2028 मध्ये संपणार होता. कार्यकाळ पूर्ण होण्यास सुमारे 21 महिने बाकी असताना त्यांनी सेवेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासकीय वर्तुळातही विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या आर. एस. गोपालन यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज ओडिशा सरकार आणि भारत निवडणूक आयोगाच्या विचाराधीन आहे.

अलीकडेच भुवनेश्वरचे डीसीपी जगमोहन मीणा यांनी राजीनामा दिल्यानंतर गोपालन यांनी व्हीआरएससाठी अर्ज केल्याने ओडिशातील प्रशासकीय व्यवस्थेतील कामकाजाचे वातावरण आणि अंतर्गत दबावांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या दोन्ही घटनांमध्ये थेट संबंध असल्याचे कोणतेही अधिकृत पुष्टीकरण झालेले नाही.

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande