
रायगड, 01 ऑक्टोबर (हिं.स.) - येथील दिवेआगरच्या समुद्रात आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. सर्व विद्यार्थी हे पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील एका खासगी क्लासचे विद्यार्थी होते. ते एकत्र सहलीला आले होते. या दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थी विनार्स ॲकॅडमी या क्लासचे विद्यार्थी होते. आठही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व विद्यार्थी इयत्ता अकरावी आणि बारावीचे होते. एकूण 42 विद्यार्थी सहलीसाठी दिवेआगरच्या समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. यामध्ये 17 मुली आणि 25 मुलांचा समावेश होता.
आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहेत. तसेच इतर विद्यार्थी आणि शिक्षक देखील याच आरोग्य केंद्रावर असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, त्यांना वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात आले. सर्वांना शोधून समुद्रातून बाहेर काढण्यात आलं. यावेळी इतर विद्यार्थी, पोलीस आणि शिक्षकांनी या सर्व विद्यार्थ्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. आठही विद्यार्थ्यांचा या घटनेत मृत्यू झाला.
दिवेआगारचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी माध्यमांनी दिलेल्या माहितीत सांगितले की, आळंदीची एक पोलीस प्रशिक्षण अॅकॅडमी आहे. त्यातील काही विद्यार्थी येथे सहलीसाठी आले होते. ते पाण्यात पोहत असताना एक जण बुडाला, त्याला वाचवण्यासाठी गेले असता एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.
दिवेआगर येथील 'महाकाली वॉटर स्पोर्ट्स'चे मालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात शोधमोहीम राबवली. आपल्या जीवाची पर्वा न करता भाऊ साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक प्रयत्नांनंतर आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.
दुर्घटनेची माहिती मिळताच दिघी सागरी बोर्ली पंचतन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष आवटी हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील वैद्यकीय तपासणी व कायदेशीर प्रक्रियेसाठी बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी