
नवी दिल्ली , 01 ऑक्टोबर (हिं.स.)।पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी एसआयआरच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही सुरुवातीपासूनच नागरिकांचे अधिकार आणि त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी लढत आहोत.ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की, देशभरातील मतदारांचे अधिकार हिरावून घेण्याचे आदेश ज्ञानेश कुमार यांनी दिले आहेत. त्यामुळे आपण त्यांना ‘व्हॅनिश कुमार’ म्हणत असल्याचे त्यांनी सांगितले. “मी त्यांचे नाव घेत नाही, कारण ज्यांनी लोकांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे, त्यांना मी माफ करू शकत नाही,” असेही त्या म्हणाल्या.
एसआयआरवर यापूर्वी कधीही चर्चा झाली नव्हती, मात्र पश्चिम बंगालमध्ये आम्ही लढा सुरू केल्यानंतर या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. त्या म्हणाल्या, “आम्ही पीडितांना घेऊन निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेलो होतो. मात्र, तेथे आमचा खूप अपमान करण्यात आला. सप्टेंबर २०२५ पर्यंत बंगालची परिस्थिती अशी होती की, जणू तिथे राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.”
“बिहारमध्ये एसआयआरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काँग्रेस आणि आरजेडीने मतदार यादीतून नावे हटवण्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या प्रक्रियेतील तपशील समजून घेण्याची गरज होती. त्यांनी प्रयत्न केला, मात्र एसआयआरच्या बाबतीत प्रत्येक बाब बारकाईने तपासावी लागते,” असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्र्यांनी असा आरोपही केला की, सुरक्षाकर्मी घरोघरी गेले आणि बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीला मतदान करू नये, यासाठी लोकांना धमकावले. पश्चिम बंगालमध्ये मतदारांची नावे मतदार यादीतून हटवण्यात आल्याचाही त्यांनी आरोप केला. टीएमसीने जिंकलेल्या मतदारसंघांमध्ये अधिक मतदारांची नावे हटवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांना २०२३ मध्ये देण्यात आलेल्या कायदेशीर संरक्षणाच्या तरतुदीवरही ममता बॅनर्जी यांनी प्रश्न उपस्थित केले. ज्ञानेश कुमार यांनी लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला असून, देशातील जनता त्यांना माफ करणार नाही, असे त्या म्हणाल्या.
इंडिया आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर तीव्र टीका करत त्यांना ‘डाकू’ संबोधले आणि त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. निवडणूक प्रक्रियेत ‘मतांची चोरी’ झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही, तर विरोधी पक्षांकडून मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode