
नवी दिल्ली, १ ऑक्टोबर (हिं.स.) । वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाल्यामुळे वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा तिसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजचा संघात समावेश करण्यात आला आहे.
गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान प्रसिद्ध कृष्णाला डाव्या हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. केवळ पाच षटके गोलंदाजी करून तो मैदान सोडून गेला. पुढील तपासणी आणि पुनर्वसनासाठी तो आता बंगळूरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दाखल होईल.
प्रसिद्धच्या जागी तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यासाठी अंशुल कंबोजचा संघात समावेश करण्यात आला आहे. तो चंदीगडमध्ये भारतीय संघात सामील होईल. तिसरा एकदिवसीय सामना 3 ऑक्टोबर रोजी चंदीगड येथील नवीन पीसीए स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठीही भारतीय संघात बदल करण्यात आले आहेत. वरिष्ठ निवड समितीने संघ व्यवस्थापनाशी सल्लामसलत करून वॉशिंग्टन सुंदरला टी-२० संघातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ११ ऑक्टोबरपासून रणजी ट्रॉफी हंगाम सुरू होत असल्याने, सुंदरला आपल्या राज्य संघासाठी लाल चेंडूचे क्रिकेट खेळून कसोटी मालिकेची तयारी करता येईल.
सुंदरच्या जागी नमन धीरचा टी-२० संघात समावेश करण्यात आला आहे. याचा अर्थ, वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान भारताला एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही संघांमध्ये बदल करावे लागले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे