आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: भारतीय संघ पुरुष हॉकीच्या अंतिम फेरीत; कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ४-३ ने विजय
नागोया (जपान०, 01 ऑक्टोबर (हिं.स.) । आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील पुरुषांच्या हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत, गतविजेत्या भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४-३ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.सामन्याच्या सुरुवातीला भारताचे वर्चस्व दिसू
भारतीय हॉकी संघ


नागोया (जपान०, 01 ऑक्टोबर (हिं.स.) । आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील पुरुषांच्या हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत, गतविजेत्या भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४-३ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.सामन्याच्या सुरुवातीला भारताचे वर्चस्व दिसून आले आणि पहिल्या क्वार्टरमध्येच भारताने २-० अशी आघाडी घेतली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन पेनल्टी कॉर्नर्सचे रूपांतर शक्तिशाली 'ड्रॅग-फ्लिक्स'द्वारे गोलमध्ये केले.

पाकिस्तानने आक्रमक सुरुवात केली आणि तिसऱ्या मिनिटाला त्यांना पहिला 'शॉट ऑन टार्गेट' मिळाला, परंतु गोलरक्षक सूरज करकेरा याने तो बचावला. त्यानंतर चौथ्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. अनेक संधी निर्माण झाल्यानंतर, पाचव्या मिनिटाला हरमनप्रीतने अली रेझाच्या पायांमधून चेंडू जाळीत धाडून भारताचे खाते उघडले. १३ व्या मिनिटाला भारताने आपली आघाडी दुप्पट केली. हरमनप्रीतने पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरवर शक्तिशाली 'ड्रॅग-फ्लिक' मारला आणि चेंडू गोलपोस्टवरील बचावपटू व 'रशर'च्या मधून वेगाने व जमिनीलगत गोलजाळीत धाडला.

पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस पाकिस्तानला अनेक पेनल्टी कॉर्नर्स मिळाले, परंतु भारताने आपली आघाडी कायम राखली. दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारताचे वर्चस्व कायम राहिले आणि २४ व्या मिनिटाला त्यांनी आघाडी वाढवली. शिलानंदने डावीकडून धावत जाऊन पास दिला आणि मध्यभागी असलेल्या सुखजीत सिंगने चेंडूची दिशा बदलून गोल केला. २९ व्या मिनिटाला पाकिस्तानने एक गोल परत केला. अबू बकरचा 'ड्रॅग-फ्लिक' मोहितला लागला आणि चेंडू गोलमध्ये गेला, ज्यामुळे मध्यांतरापर्यंत भारताची आघाडी ३-१ अशी झाली.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताचे वर्चस्व राहिले, परंतु त्यांना आणखी गोल करता आले नाहीत. मात्र, या सत्राच्या अखेरीस पाकिस्तानने जोरदार पुनरागमन केले. ४४ व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगला 'ग्रीन कार्ड' दाखवण्यात आले. पाकिस्तानने याचा लाभ घेतला आणि हनान शाहिदने गोल करून हे अंतर 3-2 ने कमी केले. चौथ्या सत्रातील ४९ व्या मिनिटाला पाकिस्तानने सामन्यात पुनरागमन केले. उजवीकडून 'सर्कल'मध्ये प्रवेश केल्यानंतर वाहीद राणाने गोल करत ३-३ ने बरोबरी साधली. सामना बरोबरीत असताना दोन्ही संघांनी निर्णायक गोलसाठी प्रयत्न केले. ५४ व्या मिनिटाला पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण सुफियानचा 'ड्रॅग-फ्लिक' अमित रोहिदासने अडवला.

सामना संपायला साधारण ९० सेकंद बाकी असताना भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण पाकिस्तानने या निर्णयाविरुद्ध यशस्वी 'रिव्ह्यू' घेतला आणि तो निर्णय फिरवला गेला; परिणामी भारताला 'फ्री-हिट' देण्यात आली. अखेरीस, केवळ ५० सेकंद बाकी असताना भारताने विजयी गोल नोंदवला. अभिषेकचा प्रयत्न सुरुवातीला गोलकीपरने रोखला आणि त्यानंतर आलेला 'रिबाउंड'ही अडवण्यात आला, तरीही अखेरीस चेंडू पाकिस्तानच्या हॉकीपटूच्या हॉकी स्टिकला लागून दिशा बदलल्यामुळे भारताचा गोल झाला. आणि 4-3 ने निर्णायक आघाडी घेतली. त्यानंतर पाकिस्तानला पुन्हा बरोबरी साधता आली नाही. अशा प्रकारे भारताने हा रोमांचक उपांत्य सामना जिंकला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष हॉकीच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande