
नागोया (जपान), १ ऑक्टोबर (हिं.स.) भारतीय कुस्तीपटू नितेश सिवाचने आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुषांच्या ९७ किलो ग्रीको-रोमन प्रकारात रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. सुवर्णपदकाच्या सामन्यात नितेश जपानच्या युरी नाकाझातोकडून ०-४ ने पराभूत झाला.
या रौप्य पदकासह, नितेश आशियाई खेळांमध्ये ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. यापूर्वी, भारताने आशियाई खेळांमध्ये या प्रकारात केवळ चार कांस्य पदके जिंकली होती.
ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये आशियाई खेळांतील सुवर्णपदकासाठी भारताची प्रतीक्षा सुरूच आहे. भारताने या प्रकारात शेवटचे सुवर्णपदक १९६२ च्या जकार्ता आशियाई खेळांमध्ये जिंकले होते. त्या स्पर्धेत ५२ किलो गटात आणि गणपत अंधाळकर यांनी ९७ किलोवरील गटात सुवर्णपदक जिंकले होते.
नितेशने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. मात्र, सुवर्णपदकाच्या सामन्यात जपानी पैलवान नकाझातोने त्याला ४-० ने पराभूत करून विजेतेपद पटकावले. नितेशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, परंतु त्याची ही कामगिरी भारतीय ग्रीको-रोमन कुस्तीच्या इतिहासात एक महत्त्वाचा अध्याय बनली आहे.
हरियाणातील सोनीपतच्या जाखसी गावचा रहिवासी असलेल्या नितेशने २०१२ मध्ये प्रताप स्पोर्ट्स स्कूलमध्ये कुस्तीला सुरुवात केली. त्याचे वडील दूधविक्रेते आहेत आणि आपल्या मुलाला एक यशस्वी पैलवान म्हणून पाहण्याचे त्यांचे स्वप्न नितेशसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहिले आहे.
नितेशने २०२२ च्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. त्यानंतर त्याने २०२३ च्या २३ वर्षांखालील आशियाई स्पर्धेत कांस्यपदक, २०२४ च्या २३ वर्षांखालील आशियाई स्पर्धेत रौप्य पदक आणि २०२५ च्या वरिष्ठ व २३ वर्षांखालील आशियाई स्पर्धेत कांस्यपदके जिंकली. २०२६ च्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक जिंकून त्याने आपली शानदार कामगिरी सुरु ठेवली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे