
नवी दिल्ली , 01 ऑक्टोबर (हिं.स.)।जगभरात एकाच वेळी अनेक युद्धे सुरू आहेत. त्याचा परिणामही एकाच वेळी अनेक क्षेत्रांवर स्पष्टपणे होताना दिसत आहे. वाढत्या या संकटांच्या पार्श्वभूमीवर आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मोठा इशारा दिला आहे. आगामी काही महिन्यांत जगाला मोठ्या आणि गंभीर अन्नसंकटाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा परराष्ट्रमंत्र्यांनी दिला आहे.
संयुक्त राष्ट्र महासभेच्या (यूएनजीए) उच्चस्तरीय बैठकीनंतर न्यूयॉर्कमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही चिंता व्यक्त केली. जयशंकर यांनी सांगितले की, विकसनशील देश सध्या ‘४एफ’ म्हणजेच अन्न (फूड), इंधन (फ्युएल), खत (फर्टिलायझर) आणि वित्त (फायनान्स) या चार आघाड्यांवर गंभीर दबावाचा सामना करत आहेत.युक्रेन आणि इराण-खाडी क्षेत्रात सुरू असलेले संघर्ष, व्यापारी मार्गांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांसह वेगाने बदलणारे हवामानविषयक धोके ही या संकटामागील प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्नाच्या बाबतीत आज अशी परिस्थिती निर्माण होत आहे की, जगातील काही प्रमुख धान्य निर्यातदार देश आपली निर्यात करण्यास सक्षम राहणार नाहीत, अशी चिंता जयशंकर यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर जगभरात खतांची निर्माण झालेली मोठी टंचाई आणि ‘अल निनो’चे धोकादायक परिणाम यांचाही त्यांनी उल्लेख केला. हे सर्व घटक एकत्रितपणे आगामी काही महिन्यांत भीषण अन्नसंकट निर्माण करू शकतात, असे त्यांनी सांगितले.
यामागील एक प्रमुख कारण काळा समुद्र आहे. रशिया आणि युक्रेन हे जगभरात गहू आणि इतर धान्यांचे मोठे पुरवठादार आहेत. मात्र, या भागातील बंदरे आणि सागरी वाहतूक मार्गांमध्ये सातत्याने निर्माण होणाऱ्या अडथळ्यांमुळे धान्याची निर्यात मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. अहवालांनुसार, सप्टेंबरमध्ये रशियाची गहू निर्यात घटून केवळ १० लाख टनांवर आली. गेल्या वर्षी याच काळात ती सुमारे ५० लाख टन होती. युक्रेनची निर्यातही निम्म्यावर आली आहे.या पुरवठा संकटामुळे जूनपासून जागतिक बाजारपेठेत गव्हाच्या किमतीत वेगाने वाढ झाली आहे.
काळ्या समुद्रातील मार्ग बंद किंवा बाधित झाल्यामुळे युक्रेन आता बाल्टिक समुद्रातील बंदरांमार्फत पर्यायी मार्ग शोधत आहे. मात्र, या नव्या मार्गांमुळे वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यासाठी मोठ्या पायाभूत सुविधांची उभारणी तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतीची आवश्यकता भासणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode